दोन्ही कॉंग्रेसच्या प्रतिष्ठेची आज सत्व परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर कोण जाणार याचा फैसला उद्या होत आहे. गेल्या वीस वर्षांत प्रथमच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा या मतदारसंघासाठी काडीमोड झाला असून यानिमित्ताने दोन्ही कॉंग्रेसमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. या निकालानंतर पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना अधिक तीव्र होणार आहे. मतदार बलाबलात राष्ट्रवादी वरचढ असली तरी त्यांच्यासमोर आव्हान आहे ते कदम बंधूंचे.

सांगली - सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर कोण जाणार याचा फैसला उद्या होत आहे. गेल्या वीस वर्षांत प्रथमच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा या मतदारसंघासाठी काडीमोड झाला असून यानिमित्ताने दोन्ही कॉंग्रेसमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. या निकालानंतर पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना अधिक तीव्र होणार आहे. मतदार बलाबलात राष्ट्रवादी वरचढ असली तरी त्यांच्यासमोर आव्हान आहे ते कदम बंधूंचे. स्वतः मोहनराव आणि पतंगराव यांचा दोन्ही जिल्ह्यांत गेल्या तीन-चार दशकांपासून संपर्क आहे आणि या निवडणुकीसाठी आवश्‍यक असे सर्व पत्ते त्यांच्याजवळ आहेत. त्यामुळेच हा सामना कधी नव्हे इतका चुरशीचा झाला आहे. 

निवडणुकीच्या रिंगणात मोहनराव श्रीपतराव कदम (कॉंग्रेस), शेखर गोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), शेखर विश्‍वास माने (अपक्ष व कॉंग्रेस बंडखोर) व मोहनराव गुलाबराव कदम (अपक्ष सातारा) असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात खरी लढत शेखर गोरे व मोहनराव कदम यांच्यात असेल. या निवडणुकीच्या निमित्ताने साताऱ्यात आमदार जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे असा भाऊबंदकीचा वाद रंगला आहे. आमदार जयकुमार गोरे हे कॉंग्रेसचे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निष्ठावान आहेत. ही निवडणूक पक्षीय पातळीवर लढून राष्ट्रवादीशी पंगा घ्यायचाच असा इरादा घेऊनच श्री. चव्हाण यांनी आघाडीचा काडीमोड घेण्याच पुढाकार घेतला होता. त्याचवेळी त्यांनी सांगलीत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव यांना उमेदवारी द्यायची असा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी दिल्लीपर्यंत प्रतिष्ठा पणाला लावली. ही निवडणूक माजी मंत्री पतंगराव कदम यांच्यासाठीही प्रतिष्ठेची असेल. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत बंधू मोहनराव यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळला आहे. श्री. कदम आमदार व्हावेत यासाठी आयुष्यभर कमीपणा घेतलेल्या मोहनरावांसाठी आमदार करण्याची जबाबदारी श्री. कदम यांच्या खांद्यावर आहे. 
 

साताऱ्यात मध्यंतरीच्या कालावधीत कॉंग्रेसने राष्ट्रवादीविरोधात घेतलेल्या भूमिकेचे पडसाद या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. त्यातून हे आघाडीतील दोन्ही मित्र पक्ष आता एकमेकांचे शत्रू बनले आहेत. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी असून, या निवडणुकीतही त्यांचे मतदानही जास्त आहे; पण आजपर्यंत राष्ट्रवादीने जिल्ह्यातील सत्तेत कॉंग्रेसचा नेहमीच वापर केला. त्याचा बदला घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे यांनी वर्षभरापासून राष्ट्रवादीची खोड मोडण्यासाठी व्यूहरचना केली आहे. त्याचा प्रत्यय राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेतील खांदेपालटाच्या वेळी आला. राष्ट्रवादीला स्वत:चाच जिल्हा परिषद सदस्याविरोधातील अविश्‍वास ठराव यशस्वी करता आला नाही. त्यासाठी कॉंग्रेसला राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांची मदत मिळाली. आताही त्यांची भूमिका कॉंग्रेससाठीच पूरक असेल अशी चिन्हे आहेत. माण तालुक्‍याच्या राजकारणात जयकुमार गोरे यांना आमदार करण्यात त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा मोठा वाटा आहे; पण कौटुंबिक कारणांनी त्यांच्यात बिनसले आणि शेखर गोरे यांनी सवता सुभा निर्माण केला. त्यानंतर ते राष्ट्रीय समाज पक्षातून कार्यरत राहिले. पंचायत समितीतही त्यांनी वर्चस्व निर्माण केले. शेखर गोरे व जयकुमार गोरे यांच्यातील भाऊबंदकीच्या वादामुळेही जयकुमार गोरे हे कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने ताकद लावताना दिसत आहेत. त्याचवेळी गोरे यांची उमेदवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली असून त्यांना निवडून आणायची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे दिली आहे. स्वत: अजितदादा आज महाबळेश्‍वर येथे तळ ठोकून सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून असल्याचे समजते. 
 

बंडाचा फटका कुणाला? 
श्री. कदम यांच्या वाटेत कॉंग्रेस नगरसेवक शेखर माने यांनी अडथळे उभे केले आहेत. त्यांची उमेदवारी आणि माघार नाट्य निवडणूक काळात कायम चर्चेत राहिले आहे. कॉंग्रेसमधील सर्व प्रस्थापित नेत्यांनाच त्यांनी आव्हान देत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांच्या उमेदवारीचा प्रथमदर्शनी फटका कॉंग्रेसला बसेल अशी चर्चा होती पण त्याचवेळी ही मते राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार नाहीत, हीसुद्धा कदम यांची जमेची बाजूच म्हणता येईल. 

Web Title: Satara,Sangli-seat Legislative Council, who will be the local governments decided tomorrow