गाढवांचा बंदाेबस्त करा ; राऊत, आव्हांडावर सातारकरांचा हल्लाबाेल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

सातारा शहरातील सर्वसामान्य माणूस खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहे. सातारामधील माजी खासदार उदयनराजे भाेसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

सातारा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पूरावा मागितल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज (गुरुवार) सातारकरांनी शहरात कडकडीत बंद पाळला. श्री. राऊत व मंत्री आव्हाड यांचा निषेध केला. 

आज (गुरुवार) सकाळी सातारकरांनी शहरातून निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा राजवाडा, मोती चौक, कमानी हौद, छत्रपती शाहू चौक, पोवई नाका मार्गे छत्रपती शिवाजी सर्कलपर्यंत पोहचला. या मोर्चातील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय....संजय राऊत हाय हाय... अशा घोषणा दिल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

हेही वाचा - छत्रपतींच्या प्रत्येक गादीविषयी आदर, भाजपने माफी मागावी : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांविरोधात केलेल्या वक्तव्याचा कार्यकर्त्यांनी, नागरीकांनी घोषणाबाजीने निषेध केला. यावेळी दोन गाढवांच्या गळ्यात राऊत आणि आव्हाड यांच्या नावाचे फलक लावून त्यांना फिरविण्यात आले.

नक्की वाचा - शिवछत्रपती घराण्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही ; सातारा बंद

या आंदोलनात नगराध्यक्ष माधवी कदम, उपाध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, अमोल मोहिते, अशोक मोने, अविनाश कदम, संदीप शिंदे, अर्चना देशमुख, सुजता राजेमहाडिक, सविता फाळके, अनिता घोरपडे, निशांत पाटील, मिलींद काकडे, राजू भोसले, यशोधन नारकर, रवी साळुंखे, ज्ञानेश्‍वर फरांदे, गीतांजली कदम, रंजना रावत यांच्यासह सातारा व नगरविकास आघाडीचे नगरसेवक व तसेच उदयनराजे समर्थक उपस्थित होते.

 
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर म्हणाले शिवसेनेच्या जिवावर राज्यसभेवर खासदार म्हणून असलेला संजय राऊत याने केलेल्या बेताल वक्तव्याचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करते. एक दिवसापुर्वी हा माणूस म्हणतो त्या पुस्तकाबाबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी काही तरी बोलावे, त्यांनी निषेध व्यक्त करावा अशी मागणी करतो. दूसऱ्या दिवशी उदयनराजे यांनी आपली भुमिका पत्रकार परिषदेतून मांडली. तेव्हा पून्हा हा सदगृहस्थ म्हणतो छत्रपती शिवरायांचे वंशज असल्याचे पूरावे द्या. त्याच्या या बेताल वक्तव्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

राजधानी सातारामधून तर सर्वसामान्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. राऊत याची काही दिवसापुर्वी एंजिओप्लास्टी झाली आहे. त्यावेळी त्याच्या मेंदूचा काही भाग काढला असावा असे वाटते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगला डॉक्‍टर बघून त्याला तपासणे गरजेचे आहे. तसे न केल्यास या वाचाळवीरामुळे शिवसेना रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. सामान्य शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया आज आमच्याबरोबर आहेत. आज शेतकरी संघटना, दलित समाज तसेच विविध आघाडीतील पदाधिकारी उपस्थित आहेत. काटकर म्हणाले राऊत यांनी आपली वक्तव्य थांबवावीत अन्यथा उदयनराजेंनी म्हटल्याप्रमाणे जनताच त्यांना योग्य आणि चोख उत्तर देईल आणि कायमचा बंदोबस्त करेल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satarkar Protested Against Sanjay Raut Statement On Udayanraje Bhosale