Vidhan Sabha 2019 मोदींच्या घोषणांची सातारकरांना उत्कंठा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

जिल्ह्यातील बेरोजगारी, उच्च शिक्षणाच्या सोयींबाबत निर्णयाची अपेक्षा.

सातारा : "विकास करायचाय' या एकाच मुद्दामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात नजीकच्या काळात राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 17) येथे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आगामी काळात काय कायापालट होणार याची दिशा मोदींच्या भाषणातून समोर येणार का, हा प्रश्‍न आहे. जिल्ह्यात सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या बेरोजगारी आणि उच्च शिक्षणाच्या सोयी या प्रश्‍नांबाबत मोदी कोणते ठोस निर्णय घेणार याची सातारकरांना उत्सुकता आहे.
 
संपूर्ण देशामध्ये 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेचा प्रभाव जाणवला; परंतु देशभर प्रभाव पाडणाऱ्या या लाटेचा जिल्ह्यातील राजकीय स्थितीवर फारसा परिणाम झाला नाही. दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा खासदार निवडून आला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही तीच परिस्थिती राहिली. त्यामुळे सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच राहिला. या किल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी गेल्या पाच वर्षांत भाजपने कसून प्रयत्न केले. गाव व बूथ पातळीपर्यंत पक्षाची बांधणी केली. मात्र, तेवढ्याने राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावता येणार नाही, याची खात्री कदाचित भाजपच्या धुरीणांना आली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीच्याच मातब्बरांना आपल्याकडे ओढण्याचे काम भाजपने केले. सुरवातीला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेचच खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्या माध्यमातून भाजपने बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचे मनसुबे रचले आहेत. 

दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे एकच कारण दिले आहे. ते म्हणजे विकास. मतदारसंघाचा व जिल्ह्याचा विकास करण्यासाठीच पक्ष बदलल्याचे ते सांगत आहेत. भाजपनेही जिल्ह्यातील जनतेला तेच स्वप्न दाखविले आहे. अन्य मतदारसंघांतील उमेदवारही याच मुद्‌द्‌यावर मत मागत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी साताऱ्यात येत आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये आघाडी व युतीच्या उमेदवारांचे जोरदार घुमशान सुरू आहे. त्यामुळे मोदींच्या या दौऱ्याची जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्याच्या चर्चाही झडत आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो जिल्ह्याचा विकास काय होणार आणि मोदी त्यासाठी काय भूमिका मांडणार. 

जिल्ह्याचा विचार केल्यास बेरोजगारी, उच्च शिक्षणाच्या चांगल्या सुविधा व सिंचन हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. उच्च शिक्षणाच्या चांगल्या सोयी साताऱ्यात नाहीत. त्यामुळे दहावी- बारावी नंतर येथील मुलांना बाहेर जिल्ह्याची वाट पकडावी लागत आहे. तेव्हापासून सुरू होणारी धावपळ थांबायचेच नाव घेत नाही. जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग- धंदे नाहीत. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या साताऱ्यात तर त्याची वानवाच आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबर नोकऱ्यांसाठीही इथल्या तरुणांना मुंबई- पुण्याची वाट धरावी लागते. उद्योग- धंदे नसल्यामुळे स्वयंरोजगारावरही मर्यादा येतात. त्यामुळे इथल्या युवकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व त्यांच्या हाताला काम मिळणे या महत्त्वाच्या मुद्‌द्‌यावर तातडीने काम होणे आवश्‍यक आहे. 

 

विकासाच्या मुद्‌द्‌यावर लुभावण्याचे प्रयत्न
 
सिंचनाच्या योजनांचाही जिल्ह्यात महत्त्वाचा प्रश्‍न आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्यापही पाण्याअभावी शेतकऱ्यांची मोठी परवड होत आहे. प्राकृतिक सौंदर्याची खाण असलेल्या या जिल्ह्यात पर्यटनाच्या अनेक चांगल्या संधी निर्माण करता येऊ शकतात; परंतु त्यासाठी ठोस कृती आरखडा तयार करण्याची गरज आहे. विकासाच्या मुद्‌द्‌यावर येथील जनतेला लुभावण्याचे प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहेत. त्यामुळे उद्याच्या सभेत मोदी त्या अनुषंगाने काय भूमिका घेतात याकडे सातारकरांचे लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satarkar;s are keen on Modi's announcement