satej patil best in kolhapur district political
satej patil best in kolhapur district political

सतेज पाटीलच पडले भारी 

कोल्हापूर - पहिल्यांदा विधानपरिषद आमदार असूनही मंत्रिपद मिळवून राज्याच्या राजकारणात दबदबा सिद्ध केलेल्या गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पालकमंत्रिपदाबाबतच्या सर्व शक्‍यता फेटाळून लावत हेही पद आपल्याकडे खेचून आणल्याने जिल्ह्याच्या राजकारणात ते भारी पडल्याचे बोलले जाते. 

विधानसभेच्या कोल्हापूर दक्षिणमधून श्री. पाटील इच्छुक होते; पण विधानपरिषद आमदाराला विधानसभेची उमेदवारी नसल्याचे पक्षांकडून सांगण्यात आले. त्यानंतर श्री. पाटील यांनी पुतणे ऋतुराज यांच्यासह कॉंग्रेसचे चार आमदार निवडून आले. तत्पूर्वीच जिल्हाध्यक्ष पदावर श्री. पाटील यांची वर्णी लागली होती, त्यामुळे या विजयाचेही श्रेय त्यांनाच जाते. राज्यात ज्या वेळी भाजपला घालवण्यासाठी सेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली, त्याच वेळी श्री. पाटील यांचे मंत्रिपद निश्‍चित होते, तथापि त्यात त्यांच्या विधानपरिषद आमदारकीचा अडथळा होता. कॉंग्रेसने पूर्ण बहुमत असतानाही अपवाद वगळता कधी विधानपरिषद आमदाराला मंत्रिपदाची संधी दिली नव्हती; पण त्यालाही सतेज पाटील अपवाद ठरले. 

मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झाली. कोल्हापुरात कॉंग्रेसचे आमदार जास्त असल्याने कोल्हापूरचे मंत्रिपद कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडे गेले, त्यातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोल्हापूरचे पालकमंत्रिपदी तर सतेज पाटील यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली; पण ज्यादिवशी या नियुक्‍त्या झाल्या त्याचदिवशी श्री. थोरात यांनी आपण यासाठी उत्सुक नसल्याचे सांगितल्याने पुन्हा कोण ? याची चर्चा रंगली. त्यातून कॉंग्रेस व राष्ट्रवादीत जिल्ह्यांची अदलाबदल होऊन राष्ट्रवादीच्या वाट्याला कोल्हापूर येईल व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती होईल असे वाटत होते. श्री. मुश्रीफ यांनी त्यासाठी फिल्डींग लावली होती, त्यातून मुश्रीफ-सतेज यांच्यात टोलेबाजी रंगली. अखेर या पदावर सतेज यांचीच निवड झाल्याने ते सर्वच पातळ्यांवर भारी पडल्याचे स्पष्ट झाले. 

प्रशासकीय यंत्रणा ताब्यात 
मंत्री झाल्यानंतर एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळणे प्रतिष्ठेचे समजले जाते. त्यातून काही ठरावीक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी तर रस्सीखेच पाहायला मिळते. कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाबाबतचा अनुभवही काहीसा तसाच आहे. जिल्ह्याच्या संपूर्ण यंत्रणेवर पालकमंत्री या नात्याने वर्चस्व ठेवण्याची संधी मिळते. त्यामुळे आपल्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी मंत्र्यांची धडपड सुरू असते. त्यात सतेज पाटील यांनी बाजी मारली आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com