कपिल पाटलांकडून ‘नाही रे’ वर्गाला न्याय

कपिल पाटलांकडून ‘नाही रे’ वर्गाला न्याय

कोल्हापूर - ‘समाजातील ‘नाही रे’ वर्गाचे प्रश्‍न विविध व्यासपीठांवर मांडून, त्यांना न्याय देण्याचे काम आमदार कपिल पाटील यांनी केले,’ असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेतर्फे लोकतांत्रिक जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष व शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा सत्कार आज आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. दसरा चौकात झालेल्या या कार्यक्रमात पाटील बोलत होते. महापौर सौ. सरिता मोरे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, अशोक बेलसरे, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी उपस्थित होत्या. 

पाटील म्हणाले, ‘‘कपिल पाटील यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याचा सन्मान शाहू महाराजांच्या जन्मभूमीत होतो. याचा कोल्हापूरवासीयांना नक्कीच अभिमान आहे. पाटील यांनी नेहमीच चळवळीच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम केले. आमदार झाल्यापासून शिक्षकांचे असोत किंवा ‘नाही रे’ वर्गाचे प्रश्‍न असो, त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे.’’ 
सत्काराला उत्तर देताना कपिल पाटील म्हणाले, ‘‘मी पहिल्यांदा आमदार झालो ते शाहू जयंती दिवशीच. त्या वेळी मी प्रतिक्रिया देताना शाहूंच्या विचारानेच काम करू असे सांगितले होते. शाहू महाराज आणि त्यांचे कोल्हापूर हे चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी तीर्थक्षेत्र आहे. शाहू महाराज हे सर्व समतावादी कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आहेत; तरीही महाराजांना तसा न्याय उशिराच मिळाला.’’

ते म्हणाले, ‘‘शिक्षकांना जुन्या पेन्शनची मागणी होत आहे. दोन दिवसांपूर्वी जे जवान काश्‍मीरमध्ये शहीद झाले, त्यांना पेन्शन मिळणार नाही. या जवानांना अगोदर पेन्शन मिळावी; मग आमचा विचार व्हावा. या पेन्शनचा अधिकार आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तो कायदा बरखास्त करण्याचे काम पहिल्यांदा सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने केले. आता पुन्हा तेच सत्तेवर आहेत. जेव्हा जेव्हा भाजप किंवा उजव्या शक्ती देशात सत्तेवर आहेत, त्या वेळी त्याआधी बनलेले कामगारहिताचे, लोककल्याणाचे कायदे त्यांनी बरखास्त केले.’’ 

शहिदांसाठी ५१ हजार
पुलावामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचे स्वरूप बदलण्यात आले. त्याचबरोबर शिक्षक भारतीच्या वतीने शहीद जवानांसाठी ५१ हजार रुपये देण्याचे आमदार कपिल पाटील यांनी जाहीर केले. 

तर पाटील यांनी अर्थमंत्री व्हावे !
‘कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री व्हावे,’ असे अनेकांनी भाषणात सांगितले. त्याचा संदर्भ घेत पाटील म्हणाले, ‘‘मी शिक्षणमंत्री होणार असेन, तर पहिल्यांदा सतेज पाटील मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत; पण तसे झाले तर काँग्रेसचा इतिहास पाहता त्यांना जास्त धोका आहे; पण शिक्षकांचे प्रश्‍न सोडवायचे असतील तर त्यांनी अर्थमंत्री व्हावे, अशा शुभेच्छा मी देतो.’’ असे कपिल पाटील म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com