खासदार महाडिक स्वतःला शरद पवारांपेक्षा मोठे समजतात

खासदार महाडिक स्वतःला शरद पवारांपेक्षा मोठे समजतात

कोल्हापूर - खासदार झाल्यानंतर पाच वर्षे राष्ट्रवादीला विरोध करणारे स्वतःला शरद पवार यांच्यापेक्षा मोठे समजतात काय? पाच वर्षांत तुम्ही केलेली ढीगभर घाण पंधरा दिवसांत कशी निघणार? आता सगळ्यांना आघाडी धर्म शिकविता; मग पाच वर्षे तो कोठे होता? विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध केला. त्यावेळी तुम्हाला राहुल गांधी, शरद पवार आठवले नाहीत, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी निवेदनात केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आमच्यासाठी मोठेच आहेत; पण २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून तुम्ही विजय मिळविला. पाच वर्षांत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, विधान परिषद, त्यासह सहकारी संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली. ‘घड्याळ’ चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारांचा जाहीर प्रचार कोणत्या निवडणुकीत केला, याचे एक उदाहरण द्या. महानगरपालिका निवडणुकीत माझ्यासमोर धर्मसंकट आहे म्हणून परदेशात गेल्याचे सांगितले; पण प्रत्यक्षात रुईकर कॉलनीतील भाजप आमदार भावाच्या ऑफिसमध्ये बसून काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडण्यासाठी जोडण्या लावल्या.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठी सक्रिय होता. जिल्हा परिषद निवडणुकीत भावजयीला अध्यक्ष करण्यासाठी भाजपच्या सदस्यांच्या बसचे चालक झाला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा मेघा यांच्या स्थायी सभापती निवडीवेळी बंगल्यात मीटिंग घेऊन त्यांच्या पराभवासाठी रणनीती आखली. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष राजू लाटकर घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवीत होते. त्यावेळी तुमच्या नातेवाइकांनी त्यांच्यावर हल्ला केला. सदर बाजार येथे आमदार हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर तुमच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यावेळी तुम्ही का लक्ष घातले नाही? हे सर्व करताना तुम्ही पक्षापेक्षा मोठे होता का? असाही सवाल आमदार 
पाटील यांनी केला.

महाडिक यांची सोयीची भूमिका
२८ मार्चला राजू शेट्टी यांचा अर्ज भरण्यासाठी खासदार महाडिक उपस्थित होते. २९ मार्चला हातकणंगले मतदारसंघातील सेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरायला तुमच्या भावजय शौमिका महाडिक उपस्थित होत्या. १ एप्रिलला काका नानासाहेब महाडिक यांनी हातकणंगलेचे युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पाठिंबा जाहीर केला. याचा अर्थ कोल्हापुरात तुम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गरज नाही, हेच यावरून स्पष्ट होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com