आरोप-प्रत्यारोपांतून करमणूकच!

आरोप-प्रत्यारोपांतून करमणूकच!

कोल्हापूर - आरोप-प्रत्यारोप झेलत पुढे जाणे हा राजकारणाच्या कौशल्याचा भाग  आहे. आरोप-प्रत्यारोपाची पातळी घसरली की मात्र इतरांची करमणूक होऊ लागते. नेमके अशाच प्रकारचे राजकारण खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे सुरू झाले आहे. दोघेही उमदे राजकारणी, दोघेही एकेकाळचे सहकारी, दोघांचीही बऱ्यापैकी राजकीय ताकद; पण दोघांत टोकाचे वैर भिनले. त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी खालची पातळी गाठली आहे. एक मोठा समूह आहे, की या दोघांकडून चटक-मटक होणारे आरोप ऐकायला तो टपून असतो. 

धनंजय महाडिक आणि सतेज पाटील या दोघांनीही महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणाला सुरुवात केली. राजकारणातील टक्‍क्‍याटोणप्यांची चव त्यांनी ऐन उमेदीत चाखली; पण त्यातून त्यांनी राजकारणातील पकड घट्ट केली. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकत  पुढे-पुढे जाणाऱ्या या जोडीने मुन्ना व बंटी अशी वेगळी ओळख निर्माण केली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ही आवडती  जोडी ठरली. 

२००४ मध्ये सतेज पाटील यांनी या बळावरच आमदारकी सर केली; पण,वेगळ्या महत्त्वाकांक्षेमुळे दोघांमध्ये दरी निर्माण होऊ लागली. या ना त्या निमित्ताने ही दरी वाढत राहिली आणि धनंजय विरुद्ध सतेज अशी एकमेकाला आव्हान देणारी राजकीय फळी समोरासमोर उभी ठाकली. 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत तर सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशी लढत झाली आणि सतेज यांनी बाजी मारत मंत्रिपदापर्यंत मजल घेतली. पण, तेढ वाढतच राहिले. पाचगावसारखे गाव या तेढीचा बळी ठरले. रक्तरंजित घटनांची मालिकाच सुरू झाली. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची वेळ आली. अशोक पाटील, दिलीप जाधव गटाची अक्षरशः धुळधाण झाली. 

२०१४ च्या निवडणुकीत सतेज पाटील यांना महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल महाडिक यांनी अनपेक्षित पराभवाचा झटका दिला आणि या इर्षेच्या राजकारणाचा नवा प्रवास सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्लीत आपला वेगळा ठसा उमटविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पण, सतेज पाटील हे गप्प बसणारे नसल्याने त्यांनी विधान परिषद निवडणुकीत थेट तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांनाच पराभूत करून विधानसभेतील आपल्या पराभवाचा वचपा काढला. 

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर खासदार धनंजय महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय वैर भडकले आहे. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने सतेज यांनी धनंजय यांच्या खासदारकीलाच हात घातला आणि आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडण्यास सुरवात झाली. रोज  एक नवा आरोप होऊ लागला.  या आरोपांची पातळी वैयक्तिक पातळीवर आली. 

आत्मचिंतनाची गरज
सतेज पाटील व धनंजय महाडिक या दोघांचे काही समर्थक इतके बेरकी आहेत, की ही तेढ मिटविण्याऐवजी ती वाढेल कशी, हेच पाहत आहेत. त्यांचे रोज एकमेकांवर होणारे चटपटीत आरोप ऐकणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांची रोज करमणूक होत आहे; पण या साऱ्यात सतेज व धनंजय या दोन उमद्या नेत्यांना मोठी झळ बसेल. त्यामुळे त्यांनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांची पातळी सांभाळण्याचीच गरज आहे. दुर्दैव असे, की या दोघांनाही तुम्ही शांत राहा, असे अधिकारवाणीने सांगणारा एकही ज्येष्ठ नेता जिल्ह्यात नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दोघांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com