कोल्हापूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी 'यांची' नावे चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिल्यानंतर या पदासाठी आमदार सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे यांची नावे चर्चेत आली आहेत. दरम्यान, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ज्यांनी श्री. आवाडे यांनाच बळ दिले ते मात्र त्यांच्या राजीनाम्याने तोंडघशी पडले आहेत.

कोल्हापूर - काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिल्यानंतर या पदासाठी आमदार सतेज पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे यांची नावे चर्चेत आली आहेत. दरम्यान, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ज्यांनी श्री. आवाडे यांनाच बळ दिले ते मात्र त्यांच्या राजीनाम्याने तोंडघशी पडले आहेत.

सलग ५० वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ अशी आवाडे यांची ओळख होती. इचलकरंजीत काँग्रेस म्हणजे आवाडे आणि आवाडे म्हणजे काँग्रेस असेच समीकरण होते. या जोरावर त्यांना इचलकरंजीच्या महापौरपदापासून आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदही पक्षाने बहाल केले. काँग्रेसमधील एक बढे प्रस्थ असलेल्या श्री. आवाडे यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला तो मोठा धक्का समजला जातो. 

काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष पदावरूनच श्री. आवाडे विरुद्ध पी. एन. असा वाद रंगला होता. यातून सात वर्षांपूर्वी झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांचा पराभव झाला. त्यावेळी झालेल्या हाणामारीनंतर या दोघांतील मतभेद टोकाला पोहचले, पण जिल्हाध्यक्ष पदाची पी. एन. यांची मुदत संपल्यानंतर नव्या अध्यक्ष निवडीवेळी प्रकाश आवाडे यांचे एकमेव नाव समोर होते. राष्ट्रीय पातळीवर श्री. आवाडे हे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जात होते. त्यातून नऊ महिन्यांपूर्वी प्रकाश आवाडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीच्या माध्यमातून त्यांनी पी. एन. यांनाच शह दिला होता. या राजकारणात काहींनी श्री. आवाडे यांना बळ देऊन पी. एन. यांची अडचण करण्याचा प्रयत्न केला, पण तेच आज श्री. आवाडे यांच्या राजीनाम्यामुळे तोंडघशी पडले आहेत.

श्री. आवाडे यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हाध्यक्ष कोण, याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. राज्यात आणि केंद्रात असलेले भाजपचे सरकार, राज्यात दोन्ही काँग्रेसमधून सुरू असलेली नेत्यांची मोठ्या प्रमाणात गळती या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे तरुण नेतृत्व जिल्ह्यात गरजेचे आहे. त्यातून आमदार सतेज पाटील हे पदाचे प्रमुख दावेदार असतील, त्यांनी तयारी दर्शवली नाही तर माजी खासदार जयवंतराव आवळे यांनाही संधी मिळू शकते. 
ऐनवेळी या दोघांऐवजी माजी प्रदेश सरचिटणीस ॲड. सुरेश कुराडे यांचीही वर्णी या पदावर शक्‍य असली तरी त्यांच्या नावाला स्थानिक पातळीवर विरोध होण्याची शक्‍यता आहे. 

सतेज यांच्या मेळाव्याकडे लक्ष
प्रकाश आवाडे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्याचप्रमाणे उद्या (ता. ५) आमदार सतेज पाटील यांनीही आपल्या गटाचा मेळावा बोलवला आहे. मेळाव्यात मुख्यतः दक्षिणमधील उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्‍यता असली तरी एकूण राजकीय स्थिती पाहता या मेळाव्यात ते कोणती भूमिका घेतात, याविषयी उत्सुकता असल्याने या मेळाव्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satej Patil, Jayavantrao Awale in race of Kolhapur Congress district president