दादांच्या तोंडी शिरोलीकरांचे शब्द - सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

कोल्हापूर  - महापालिकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे आपण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महापालिकेत पदाधिकारी निवडी बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी दादांचे मन कोठे गेले होते, असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांनी दादांच्या तोंडी शिरोलीकरांचे शब्द असावेत, असा टोला पत्रकारांशी बोलताना लगावला. भाजपचे चार जिल्हा परिषद सदस्य संपर्कात असल्याचा दावाही आमदार पाटील यांनी केला आहे.

जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसंदर्भात आज कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलावली होती. बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, 'महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांना महापालिका पदाधिकारी निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली होती. त्यावेळी त्यांनी निवडणूक लढविली. तेव्हा दादांचे मन कोठे गेले होते. आता विरोधक म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे केले तर आम्ही कोत्या मनाचे कसे? विरोधक म्हणून आम्ही काम करत राहणारच. त्यामुळे दादांचे तोंडून आलेले शब्द हे शिरोलीकरांचे असावेत, असे आपणास वाटते.''

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भाजपला मदत करण्याच्या हेतूने गैरहजर राहणारे राष्ट्रवादीचे विजय बोरगे व कॉंग्रेसच्या रेश्‍मा देसाई या परत कॉंग्रेस आघाडीकडे आल्या आहेत. त्यामुळे आमची सदस्य संख्या 30 वर गेली आहे. अध्यक्ष निवडीत जेवढी मते मिळाली होती, तेवढे संख्याबळ टिकविण्याचा प्रयत्न आहे. सदस्यांच्या फोडाफोडीबाबत विचारले असता आमदार श्री. पाटील यांनी भाजपचे चार सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला.

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 'जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विरोधकांना ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या करणार आहोत. पदाधिकारी निवडीत उतरणे हेदेखील विरोधी पक्षाचे काम आहे. पदाधिकारी निवडीत बिनआवाजाचा बॉम्ब फोडणार वगैरे असले काही म्हणणार नाही. राष्ट्रवादीचे विजय बोरगे अध्यक्ष निवडीत गैरहजर राहिले होते. आता ते राष्ट्रवादीत परतले आहेत.''

खासदार धनंजय महाडिक यांच्याबाबत आमदार मुश्रीफ म्हणाले, 'खासदार धनंजय महाडिक यांनी आपला मार्ग ठरविला आहे. त्यांच्या मार्गाकडे पाहण्याची काही गरज नाही. आम्ही आमच्या मार्गाने जाण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत कोणती भूमिका घेतली, तिकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता नाही. यापुढे त्यांनी पक्षविरोधी काम केले तरी त्यांच्याबाबत आमची कोणतीही तक्रार असणार नाही आणि पक्षाकडेही तक्रारही करणार नाही.''

भाजपचे सदस्य संपर्कात
जिल्हा परिषद निवडणुकीत आणखी काही आघाड्या आपल्या संपर्कात आहेत काय, असे विचारले असता आमदार सतेज पाटील यांनी कोणत्या आघाडीचे सदस्य आपल्या संपर्कात नाहीत. मात्र भारतीय जनता पक्षाचे चार सदस्य आपल्या संपर्कात असल्याचे सांगितले.

Web Title: satej patil talking