Vidhan Sabha 2019 : कोल्‍हापूर उत्तरमधून भाकपतर्फे 'यांना' उमेदवारी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

‘‘शोषण व भ्रष्टाचारमुक्त समाजव्यवस्था निर्माण करण्याचा आग्रह भारतीय कम्युनिस्ट पक्षाने धरला आहे, सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रश्‍नांवर याच पक्षाने आवाज उठवला, येणाऱ्या निवडणुकीत या पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे, त्यासाठी उमेदवार कोण आहे, यापेक्षा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला मते द्या,’’

कोल्हापूर - ‘‘शोषण व भ्रष्टाचारमुक्त समाजव्यवस्था निर्माण करण्याचा आग्रह भारतीय कम्युनिस्ट पक्षाने धरला आहे, सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रश्‍नांवर याच पक्षाने आवाज उठवला, येणाऱ्या निवडणुकीत या पक्षाचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे, त्यासाठी उमेदवार कोण आहे, यापेक्षा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला मते द्या,’’ असे आवाहन सतीशचंद्र कांबळे यांनी केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. ‘भाकप’च्या महिला फेडरेशनच्या प्रदेशाध्यक्ष स्मिता पानसरे अध्यक्षस्थानी होत्या. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाची उमेदवारी सतीशचंद्र कांबळे यांना जाहीर झाली. 

श्री. कांबळे म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला, त्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळले, म्हणून भाजपला लोकांनी निवडून दिले. त्यांनी अनेक आश्‍वासने दिली; पण त्यांची पूर्तता केली नाही. उलट जातिवाद वाढला, महागाई, शोषण वाढले, सर्वसामान्यांचे जगणे धोक्‍यात आले. अशा स्थितीत अनेक वर्षे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर सत्ताधाऱ्यांना जाब भारतीय कम्युनिस्ट पक्षाने विविध आंदोलनांतून विचारला आहे. कोल्हापुरातील टोल घालविण्यात ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, डॉ. एन. डी. पाटील यांच्यासह नेत्यांनी आंदोलन केले. टोल घालविला त्याचे श्रेय भाजप घेऊ पाहत आहे.

सर्वसामान्यांचे जगणे हिरावणाऱ्या शक्तींविरोधात निवडणूक रिंगणात भारतीय कम्युनिस्ट पक्षही उतरला आहे. स्मिता पानसरे म्हणाल्या, ‘‘शोषण, विषमतेमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्‍कील होत आहे. अशा स्थितीत शोषण व विषमतामुक्त समाजाचे स्वप्न ज्या महामानवांनी पाहिले, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार निवडून देऊया. आपल्या हक्कांसाठी झगडणारा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून देण्याची गरज आहे, त्यासाठी भाकपचा उमेदवार विजयी करण्यासाठी बळ द्यावे.’’  

यावेळी राज्य सहसचिव नामदेव गावडे, शहर सचिव रघुनाथ कांबळे, जिल्हा सहसचिव गिरीश फोंडे यांची भाषणे झाली. यावेळी उमा पानसरे, खजानीस अनिल चव्हाण, बी. एल. बरगे, दिलदार मुजावर, वाय. सी. पाटील आदी उपस्थित होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sathichandra Kamble will fight from Kolhapur North constituency