तरुणांच्या रोजगारावर भर

तरुणांच्या रोजगारावर भर

घराण्याला फार मोठा राजकीय वारसा नाही. वडील बी. टी. पाटील यांनी सरपंच आणि गोडसाखर संचालक पदाच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचला. त्या जोरावर गावच्या सरपंचपदापासून माझी राजकीय वाटचाल सुरू झाली. २६ व्या वर्षी सरपंचपद, २८ व्या वर्षी पंचायत समिती सदस्य, ४० व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य, साखर कारखाना संचालक आणि गडहिंग्लज अर्बन बॅंक चेअरमन पदावर काम करण्याची संधी जनतेने दिली. राजकारणातून समाजकारणावर लक्ष दिले. त्यातून साई एज्युकेशन सोसायटीचा जन्म झाला. राजकारण, सहकार आणि शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांच्या रोजगारावर विशेष भर दिला, असे जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

पाटील म्हणाले, ‘‘गडहिंग्लज शहरापासून अवघ्या एक किलोमीटरवर माझे गाव. यामुळे शहराशी पूर्वीपासूनच चांगला संपर्क. गडहिंग्लजला फुटबॉलची शतकी परंपरा आहे. युनायटेड फुटबॉल असोसिएशनद्वारे फुटबॉलला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला. गरीब खेळाडूंना आर्थिक मदत, रोजगार कसा मिळेल यावर भर दिला. ग्रामीण भागातील खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअरची संधी मिळावी म्हणून साई फुटबॉल क्‍लब सुरू केला. या क्‍लबचे खेळाडू आता जिल्हा पातळीवर चमकत आहेत. प्रत्येक खेळाडूला मोठमोठ्या स्पर्धेत उतरण्यासाठी पाठबळ दिले. या खेळासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने जि. प. च्या माध्यमातून एम. आर. हायस्कूलच्या मैदानाभोवती प्रेक्षक गॅलरीचा प्रश्‍न मार्गी लावला. जि.प. बांधकाम विभागातर्फे जिल्ह्यातील पहिला पायलट प्रोजेक्‍ट म्हणून गडहिंग्लजला गाळे उभाणीचे काम सुरू झाले. इच्छुक तरुणांना विविध व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याचा हा एक प्रयत्न आहे.’’

तरुणांच्या हाताला काम देणे आव्हान असतानाच राजकीय कारकिर्दीत गडहिंग्लज व संताजी घोरपडे साखर कारखाना, कागल एमआयडीसी, गडहिंग्लज अर्बन बॅंकेत ग्रामीण भागातील किमान ५० हून अधिक तरुणांना रोजगार मिळवून दिला. साई एज्युकेशनमध्ये ७६ जणांच्या हाताला काम दिले. मूकबधिर शाळेसाठी लागणारे विशेष शिक्षक आपल्याच भागातून तयार व्हावेत म्हणून डीएड, बीएड (एचआय) सुरू केले. सेंट्रींग, शेत मजुरीवर काम करणाऱ्या तरुणांना डीएचएलएसचे प्रशिक्षण देऊन रोजगार दिला. पोलिस खात्यात ग्रामीण तरुणांना संधी मिळण्यासाठी पोलिस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केले. स्पर्धा परीक्षेसह जेईई, नीट आदी प्रवेश प्रक्रियेमध्ये ग्रामीण विद्यार्थीही पुढे जावेत म्हणून भविष्यात ॲकॅडमी सुरू करण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘‘राजकीय जीवनपट संघर्षमय आहे. संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेला. आतापर्यंत कोणतेही पद सहजासहजी मिळालेले नाही. प्रामाणिक कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वामुळे प्रत्येक टप्प्यावर यश मिळत गेले. मिळालेल्या पदांचा पुरेपूर लाभ सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न केला. गिजवणे-कडगाव जिल्हा परिषद मतदासंघात विकासकामे राबवताना त्यामध्ये तरुणाईचा सहभाग घेतला. गडहिंग्लज अर्बन बॅंकेच्या माध्यमातून पान, चहा टपरीवाल्यांपासून नव्या तरुण उद्योजकांपर्यंत कर्ज स्वरूपात अर्थसाहाय्य दिले. ग्रामीण तरुणांतील लपलेल्या कलागुणांना दिशा देण्याची गरज आहे. ग्रामविकासात तरुणाईचा सहभाग गरजेचा आहे. "
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com