परवानगी न घेता, टेंडर न काढता भूमीपुजन करायचे हाच भाजपचा कारभार - तांबे

परवानगी न घेता, टेंडर न काढता भूमीपुजन करायचे हाच भाजपचा कारभार - तांबे

कोल्हापूर - मनात येईल ते बोलायचे, मनात येईल ते करायचे, कुठलीही परवानगी घ्यायची नाही, कुठलेही टेंडर करायचे नाही. पण पहिले काम काय करायचे तर भूमीपुजन करायचे. हाच कारभार सत्ताधारी भाजपचा आहे, अशी टीका महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली. 

कोल्हापूर येथे काँग्रेस तर्फे परिवर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त रविवारी जवाहर चाैकात आयोजित सभेत श्री. तांबे बोलत होते.

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचा नाकर्तेपणा हाच काँग्रेसला फायदेशीर ठरणार असल्याने २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसला फारशा प्रचाराची गरज नाही

- सत्यजित तांबे 

सत्यजित तांबे म्हणाले, ‘‘काँग्रेस हा केडरबेस पक्ष नसून मासबेस पक्ष आहे. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे देशातील शेतकरी, युवक यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे देशातील जनतेने २०१९ च्या निवडणुकीत कोणाला निवडायचे, याचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या भाषणांचे व्हिडिओ लोक स्वतःच व्हायरल करत आहेत. हे व्हिडिओ भाजप सरकारच्या अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश करणारे आहेत. त्यामुळे समाजातील अर्थिक दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षणाच्या कितीही घोषणा सरकारकडून झाल्या तरी फारसा फरक पडणार नाही. २०१४ च्या निवडणुकीत मोदींची लाट होती. त्यामुळे या लाटेत कोणीही निवडून आले. या सरकारने अपेक्षाभंग केल्याचे लोकाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाराज लोकांना काँग्रेसच्या बाजूने वळविण्यात आम्हाला यश येणार आहे. आता नरेंद्र मोदींची कोणतीही लाट नाही. युवक काँग्रेसनेही ‘चलो पंचायत’ अभियानातून तळागाळात जाऊन काम करत आहे. या अभियानाअंतर्गत पाचकलमी कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. यामध्ये बेरोजगारांना मासिक भत्ता, विनातारण बिनव्याजी कर्ज तसेच शेतकऱ्यांना विविध सवलती दिल्या जाणार आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात काँग्रेसकडून अनेक सवलती दिल्या जात आहेत.’’ 

यावेळी ॲड. गुलाबराव घोरपडे, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, दीपक थोरात, पार्थ मुंडे, अजिंक्‍य पाटील, कल्याणी माणगावकर उपस्थित होते.

सांगली लोकसभा सहज जिंकू - तांबे
भाजपकडे संघटन नसल्याने कोल्हापूर, सांगली याठिकाणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून केडरबेस कार्यकर्ते तयार करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी निवडणुकीत त्याचा काहीही फायदा होणार नाही. सांगलीत लोकसभेची जागा सहज जिंकून येईल. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी असताना आठवलेंचा पराभव व्हायला नको होता. ती चूक झाल्याचेही तांबे यांनी स्पष्ट केले. नगरमधून काँग्रेसकडून सुजय विखे चांगले उमेदवार आहेत, तरीही जागा वाटपात हा निर्णय होईल. तसेच निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या जागांवर युवक काँग्रेसला ९ विधानसभेसाठी ५० जागा द्याव्यात, अशी मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com