अल्पबचत अधिकारी सावदेकर लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - पोस्टाच्या आर.डी. कमिशन एजंटाचा परवाना तनीकरणासाठी साडेतीन हजारांची लाच घेताना अल्पबचत अधिकारी जयदीप चंद्रकांत सावदेकर (वय ४४, रा. शाहूनगर, चिंचवड, पुणे) याला आज रंगेहाथ पकडण्यात आले. 

कोल्हापूर - पोस्टाच्या आर.डी. कमिशन एजंटाचा परवाना तनीकरणासाठी साडेतीन हजारांची लाच घेताना अल्पबचत अधिकारी जयदीप चंद्रकांत सावदेकर (वय ४४, रा. शाहूनगर, चिंचवड, पुणे) याला आज रंगेहाथ पकडण्यात आले. 

कसबा बावडा येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक उदय आफळे यांनी सापळा रचून ही कारवाई केली. याबाबतची तक्रार छाया चंद्रकांत निकाडे (रा. पोहळे, तर्फ आळते, ता. पन्हाळा) यांनी दिली होती. सावदेकर याच्याकडे कोल्हापूर विभागाचा अतिरिक्त पदभार आहे. तो सध्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पबचत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आठवड्यातून केवळ एक दिवस दर बुधवारी तो कोल्हापुरात येतो, असे उपाधीक्षक आफळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पोस्टाची आरडी (बचतीचे पैसे) गोळा करण्यासाठी गावागावांमध्येअधिकृत एजंट नेमले जातात. त्याचपैकी निकाडे या एक आहेत.  त्यांच्याकडील परवान्याची मुदत ३० सप्टेंबर २०१५ला संपली होती. त्यानंतर त्यांनी नूतनीकरणासाठी अर्ज सादर करून त्याबाबतची प्रक्रिया सुरू केली होती. त्यांना पाचशे रुपये विलंब शुल्क भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी ते भरले.  तरीही त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण झाले नाही. निकाडे यांनी या कामासाठी भेट घेतली असता त्यांच्याकडे साडेतीन हजार रुपयांची लाच मागण्यात आली. यानंतर छाया निकाडे यांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. त्यानंतर सापळा रचून सावदेकरला पकडण्यात आले. एरवी रुबाबत वावरणारा सावदेकर आज मान खाली घालून एसीबीच्या कार्यालयात बसला होता. 
  
जिल्ह्यात अडीच वर्षात ८६, वर्षात २२ छापे
उपाधीक्षक आफळे यांनी कोल्हापुरातील पदभार स्वीकारल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या छाप्यांत लक्षणीय वाढ झाली. त्यांच्या अडीच वर्षांतील कारकिर्दीतील छाप्यांची यादी अशी आहे. पोलिस खाते  २७, महसूल २६, इचलकरंजी नगरपालिका ३, सिटीसर्व्हे २, सहकार २,  पाटबंधारे २, कामगार आयुक्त १, राज्य उत्पादन शुल्क १, महापालिका ३. यांपैखी एक कारवाई थेट महापौरांवर, वन विभाग १, आरटीओ १, एमएसईबी २, आरोग्य  विभाग ३,  वैध मापन कार्यालय १, कोषागार १,  ग्रामीण विकास १, कारागृह १, अन्न व औषध प्रशासन १, अल्पबचत १, जात पडताळणी- आष्टा १

कम्युनिष्ट पक्षाचे सहकार्य
सावदेकर याला सापळ्यात अडकविण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही तक्रारदाराला सहकार्य केले. नागरिकांनी भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पक्षाने केले होते. त्यासाठी हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यातूनच ही तक्रार पुढे आली. सतीशचंद्र कांबळे, मिलिंद यादव, अनिल चव्हाण, दिलावर मुजावर, मुस्ताक शेख, मधुकर माने, रियाझ शेख आदींनी तक्रारीबाबत पाठपुरावा केला होता, असे पक्षाच्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: savdekar arrested by acb