esakal | प्रसंगी वाईटपणा घ्या, पण गाव वाचवा : सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे सरपंचांना कोरोना नियंत्रणासाठी आवाहन

बोलून बातमी शोधा

Save the village: Sangli District Collector appeals to Sarpanch for corona control

अधिकार वापरून कडक भूमिका घ्या. प्रसंगी वाईटपणा घ्या, मात्र गाव वाचवा, असे आवाहन सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज जिल्ह्यातील सरपंचांना केले. 

प्रसंगी वाईटपणा घ्या, पण गाव वाचवा : सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे सरपंचांना कोरोना नियंत्रणासाठी आवाहन

sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः कोरोना संकट काळात गाव वाचवण्यासाठी जबाबदारी सरपंच आणि ग्राम दक्षता समितीची आहे. ही केवळ कागदावरील समिती नाही, तर तिला कायदेशीर अधिकार आहेत. हे अधिकार वापरून कडक भूमिका घ्या. प्रसंगी वाईटपणा घ्या, मात्र गाव वाचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज जिल्ह्यातील सरपंचांना केले. 


जिल्ह्यातील बहुतांश गावचे सरपंच, ग्रामसेवक, तालुक्‍यांचे गटविकास अधिकारी यांच्याशी डॉ. चौधरी यांनी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे यांनी या संवादात सहभाग घेतला. जिल्ह्यातून सुमारे साडेसहाशे लोक या संवादात सहभागी झाले. सरपंचांना शंका विचारून त्याचे निरसन करून घेतले. 


जिल्हाधिकारी म्हणाले, ""कोरोनाची दुसरी लाट आली आहे. हे संकट मोठे आहे. आपत्ती नियंत्रणात तुमची जबाबदारी लक्षात घ्या. तुम्हाला कायदेशीर अधिकार आहेत, ते वापरा. मी का वाईट होऊ, मी का कारवाई करू, असे समजू नका. गाव वाचवण्यासाठी ते करावे लागेल. जी दुकाने उघडी आहेत, तेथे सुरक्षित अंतर राखले जाईल, याची खबरदारी घ्या. दुकानाबाहेर रिंगण आखा. मास्क, सॅनिटायझरचा वापर वाढवा. रुग्णसंख्या ज्या भागात अधिक आहे, तेथे औषध फवारणी करा. होम आयसोलेशन रुग्ण व नातेवाईक बाहेर फिरणार नाहीत, याची खबरदारी घ्या. गरज असेल तर त्यांना नोटीस द्या. घरावर तसा बोर्ड लावा.'' 


ते म्हणाले, ""जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 10 हजार रुग्णांना लस दिली गेली आहे. लसीकरण वाढवा. आरोग्य केंद्र, उपकेंद्रात मंडप घाला, खुर्च्या आणा. पिण्याच्या पाण्याची सोय करा. 45 वर्षावरील एक अन्‌ एक व्यक्ती लस घेईल, हे पाहा. जिल्हा परिषदेतील कॉल सेंटरची माहिती गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा. त्याचे नंबर द्या. राजकीय सहभाग घ्या.'' 
श्री. डुडी म्हणाले, ""गाव ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी वेळ द्या. सामाजिक कार्यकर्ते एकत्र करा. या मोहिमेत शिक्षकांचा सहभाग आपणास मिळेल, तशा सूचना मी दिल्या आहेत.'' 

"त्यांना' क्वारंटाईन करणे गरजेचे नाही 

काही सरपंचांनी मुंबई, पुण्यातून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करावे का, अशी शंका विचारली. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, ""तशी काही गरज नाही. त्यांना कोरोना संबंधी लक्षणे दिसत असतील तर त्यांची तपासणी करून घ्या.''  

संपादन : युवराज यादव