सावित्रीच्या लेकींनी फुलले नायगाव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (जि.सातारा) येथे राज्यभरातून महिला आल्याने ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पाणी, जेवण व नाष्ट्याची खास सोय केली आहे. शिल्पसृष्टीतून अनेकांना प्रेरणा मिळाल्याचे नमूद केले. 

 नायगाव (जि. सातारा) : आकर्षक रंगबिरंगी फुलमाळांनी सजलेले स्मारक, लख्ख स्वच्छता व  घरासमोर दिसणारी सडा- रांगोळी,  त्याचबरोबर मंत्री, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचे ताफे, राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या सावित्रीच्या लेकींच्या गर्दीमुळे फुललेल्या सर्व रस्त्यांमुळे  सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव आज (शुक्रवार) त्यांच्या जयंती निमित्ताने चैतन्याने फुलले होते.

जरुर वाचा -  सावित्रीबाईंचे स्मारक हवे बाेलके

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्मारकाच्या परिसरात लख्ख स्वच्छता करण्यात येऊन स्मारक आकर्षक रंगबिरंगी फुलमाळांनी सजविण्यात आले होते. घराघरांतील महिलांनी पहाटेपासून येथील सर्वच रस्त्यांवर, तसेच प्रत्येक घरासमोर सडा व रांगोळी काढली होती.

 ग्रामपंचायत व विविध मंडळांनी गावात स्वच्छता करून गाव सजविले होते. त्यामुळे नायगावात आज दिवसभर प्रसन्न वातावरण होते. येथे येणारी प्रत्येक महिला सावित्रीबाईंच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करीत होती. स्मारक व शिल्पसृष्टी परिसरात महिलांची मोठी गर्दी होती. राज्यभरातून विविध संस्था, मंडळे गाड्या करून, खासगी वाहनांतून येथे आले होते. सटाणा (जि.नाशिक ) येथील रेखा वाघ यांच्यासह  शंभर महिला खास ज्योत घेऊन सावित्रीबाईंना नतमस्तक होण्यासाठी आल्या होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंचच्या कार्यकर्त्यांनी स्मारक परिसर घोषणांनी दुमदुमला होता.

आजूबाजूच्या शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थिनी सकाळी नऊपासूनच आपल्या शिक्षकांसमवेत येथे दाखल होत होत्या. सावित्रीबाईंच्या विजयाच्या घोषणा, तसेच गाणी म्हणत स्मारकाकडे जात होत्या. त्यामुळे नायगाव महिलांनी गजबजून गेले होते.  

आम्हांला मिळते प्रेरणा

आम्ही महिला न चुकता दरवर्षी येथे येतो. येथे आल्यावर जे समाधान व आनंद मिळतो तो कुठेच मिळत नाही. आपल्या पुढील पिढीतील लेकीबाळींना सावित्रीबाईंचा विचार व त्यांनी केलेले काम माहीत व्हावे, यासाठी येथे येऊन नवीन काहीतरी शिकून जाण्याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करतो.''

 तळेगाव (जि.पुणे.) प्राचार्य स्नेहल बाळसराफ
 
सर्व महिलांनी वर्षातून एकदा सावित्रीबाईंच्या जन्मदिनी येथे येऊन त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांच्या विचारांचा "वसा' घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसा प्रयत्न आम्ही दरवर्षी करीत असताे.

सुनीता भगत ( सामाजिक कार्यकर्त्या, पुणे)

बचतगटाच्या वस्तूंचे स्टाॅलवरही महिलांची गर्दी होती. नायगावच्या महिलांनी तयार केलेल्या मसाल्यांना मागणी होती.
 
जयश्री जमदाडे, तनिष्का.

सावित्रीबाईचा विचारांचा  वारसा आम्ही जपत आहे. गावातील मुलीच्या शिक्षणाकडे जाणिवपूर्वक लक्ष देतो 

माजी सभापती व तनिष्का शुभांगी नेवसे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Jayanti Celebreation At Naygaon