सावित्रीबाईंचे स्मारक हवे बाेलके

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

या स्मारकात फुले दाम्पत्याच्या साहित्याचे एक दालन असेल, असे ठरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या वापरातील मूळ वस्तू व साहित्य यांचे दालन होणार होते. स्मारक उभारल्यानंतर त्यांच्या प्रगतीबाबत संशोधन होण्याची जरुरी आहे

सातारा : नायगाव (ता. खंडाळा ) येथे शासनाने उभारलेले सावित्रीबाई फुले यांचे राज्य संरक्षित स्मारक महिलांसह विद्यार्थी, पर्यटकांचे प्रेरणास्त्रोत बनत आहे. सध्या विविध शालेय सहली, अभ्यासक, संशोधक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे भेटी देत आहेत. मात्र, अपूर्ण बाबी पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे.
 
नायगाव हे देशाच्या दृष्टीने प्रेरणास्थान असून, सामाजिक न्यायाचे ऊर्जाकेंद्र आहे. सावित्रीबाईंच्या जन्मगावी मंत्री छगन भुजबळ यांच्या खास प्रयत्नातून आकर्षक स्मारक उभारण्यात आले आहे. शिल्पसृष्टी उभारण्यात आली आहे. सध्या विविध शालेय सहली, अभ्यासक, संशोधक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर नायगावला भेटी देत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाईंचे समग्र जीवनचरित्र स्मारक पाहिल्यानंतर पर्यटकांच्या नजरेसमोर उभे राहण्याची आवश्‍यकता आहे. सध्या स्मारकात सावित्रीबाईंची छायाचित्रे व फलकावर अल्पचरित्र आहे; तसेच सावित्रीबाईंच्या जीवनातील घटनांचे भित्तीचित्र आहे. येथे विद्यार्थ्यांच्या सहली आल्यानंतर स्मारकात प्रोजेक्‍टरवर; तसेच अत्याधुनिक माध्यमांच्या साह्याने सावित्रीबाईंचा जीवनपट दाखवणे जरुरीचे आहे. त्या दृष्टीने पुरातत्व विभागाकडून प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे.

हेही वाचा : Video : तू माझा सांगातीच्या आवली स समाजभुषण पुरस्कार 

स्मारक पाहिल्यानंतर सावित्रीबाईंनी घेतलेले कष्ट, त्यांनी सोसलेले आघात याची माहिती सामान्य माणसाला मिळत नाही. स्मारकातून विद्यार्थी, पर्यटक व अभ्यासकांना माहिती मिळण्यासाठी त्यांच्या जीवनावरील चित्रफीत तयार करण्याची गरज आहे. 

स्मारक उभारताना सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला ती खोली, स्वयंपाकघर अशी लहान-मोठी पाच दालने तयार करण्यात आली आहेत. त्यात सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या तैलचित्रांबरोबरच त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने लावण्यात येणार होते. फुले दांपत्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेला ग्रंथसंग्रह उपलब्ध करण्यात येणार होता. हे ग्रंथाचे दालन अद्याप उभारले गेले नाही; त्याचप्रमाणे फुले दाम्पत्याच्या मूळ वस्तूंचे दालन होणार होते; मात्र याबाबत पुरातत्व विभागाकडून पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. 

स्मारकाच्या प्रगतीबाबत संशोधन जरुरीचे 

स्मारकात फुले दाम्पत्याच्या साहित्याचे एक दालन असेल, असे ठरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या वापरातील मूळ वस्तू व साहित्य यांचे दालन होणार होते. स्मारक उभारल्यानंतर त्यांच्या प्रगतीबाबत संशोधन होण्याची जरुरी आहे.

नक्की वाचा : ‘सावित्री सृष्टी’साठी हवी कल्पक दृष्टी 

सरकारकडून अपेक्षा 

राज्यातील महाविकास सरकारकडून नायगावच्या विकासासाठी खास लक्ष दिले जाईल, अशा ग्रामस्थांना अपेक्षा आहेत. स्मारकाच्या अपूर्ण कामाबाबत पुरातत्व विभागाला निधी देण्याची आवश्‍यकता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savitribai Phule Monument Of Naygaon Should Be Renovated