कहो दिलसे.... पृथ्वीराजबाबा फिरसे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

आमदार चव्हाण यांचे नाव सातारा लोकसभेसाठी चर्चेत आल्याच्या पार्श्‍वभूमीवर मेळाव्याला मोठे महत्त्व आले होते. 
 

कऱ्हाड ः कहो दिलसे... दक्षिण मे पृथ्वीराजबाबा फिरसे... अशी अखंड घोषणाबाजी करत कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभाच लढावी, यावर आज शिक्कामोर्तब करत आपल्या भावना मांडल्या. सरसकट कार्यकर्त्यांनी आमदार चव्हाण यांनी लोकसभेचा विचार न करता आमदारकीच लढविण्याचे सुचविले.
 
कऱ्हाड दक्षिणेतील बुथ कमिटी अध्यक्षांचा नियोजित मेळावा होता. त्यात आमदार चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आमदार चव्हाण यांचे नाव सातारा लोकसभेसाठी चर्चेत आल्याच्या पार्श्‍वभूमीवर या मेळाव्याला मोठे महत्त्व आले होते. 

मेळाव्यात युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवराज मोरे म्हणाले, आमदार चव्हाण यांनी काहीही निर्णय घेतला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र, कऱ्हाड दक्षिणेतील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी निर्णय घ्यावा. त्यासाठी आमदार चव्हाण यांनी कधीही हाक दिली तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोतच. कोणीही उठून टीका करावी, असे बाबांचे व्यक्तिमत्त्व नाही. मात्र, अलीकडे दक्षिणेत पिता-पुत्र थेट आरोप करत आहेत. पण, ज्यांच्याकडे लोकांचा ट्रस्टच नाही, अशा ट्रस्टचे आपण ट्रस्टी आहात, हे त्यांनी विसरू नये. कॉंग्रेसचा कार्यकर्ता शांत, संयमी आहे. तेवढाच तो आग्रहीसुद्धा आहे, याचे भान ठेवा. 

डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, कष्टकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका कॉंग्रेस पक्षाने नेहमीच ठेवली आहे. आमदार चव्हाण त्या सगळ्या विचारसरणीला पोषक ठरतील, असेच नेते आहेत. सामान्य माणसाचा विचार करणारे नेतृत्व म्हणजे आमदार चव्हाण होत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला अहोरात्र झटले पाहिजे. त्यासाठीची तयारी प्रत्येकाने करावी. 

बंडानाना जगताप म्हणाले, आमदारकी काय असते व ती नक्की कशी राबवली जाते, याचे ज्ञान अद्यापही विरोधकांना नाही. त्यांनी आमदार चव्हाण यांच्यासारख्यांना विरोध करावा, यासारखे दुर्दैव काही नाही. आमदार चव्हाण यांनी ज्यांना ओळख दिली. काय हवे ते दिले, तरीही तुम्ही आमदार चव्हाण यांच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे. आता त्यांना परत आपल्याकडे घेऊ नका. येणाऱ्या काळात त्यांना त्यांची लायकी व पद नक्कीच कळेल. त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे. आम्ही जाईल त्या गावात त्यांच्याबद्दल कोणीही चांगले बोलत नाही. त्यामुळे ते गेले ते बरे झाले. पुन्हा इकडचे रस्ते बंद करा.
 
पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील म्हणाले, आमदार चव्हाण यांच्यामुळे आनंदराव पाटील यांची ओळख साऱ्या गावभर झाली. त्या आनंदराव पाटील यांनी आमदार चव्हाण यांची साथ सोडावी, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. आमदार आनंदराव पाटील यांनी सोडून जावू नये, यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मात्र, त्यांनी ऐकले नाही. पण, आपण सोडून गेलात म्हणून येथे फारसा फरक पडलेला नाही. आपल्यामागे लोकच नाहीत. आपल्याला आमदार केले, राज्यमंत्री केले. मोठी पदे दिली, तरीही आपण गद्दारी केलीत. आता तुमच्या विजयनगरमधूनही आम्ही मताधिक्‍य घेवून दाखवू. 

मलकापूरचे राजेंद्र यादव म्हणाले, आमदार चव्हाण आपल्याला 80 हजार लोकांनी मते दिली आहेत. लाखभर लोक आपल्यासोबत आहेत. त्यामुळे त्या साऱ्या गोष्टींचा विचार करून आमदार चव्हाण निर्णय घेतील, असा आमचा विश्वास आहे. बाबा आपण कऱ्हाड दक्षिणेतूनच लढावे. त्यासाठी आम्ही तयारी केली आहे. तुम्ही येथे नाही तर विरोधक आम्हाला टेपलतील. त्यामुळे तुम्ही दक्षिणेतूनच लढावे. 

प्रतीक्षा खोत म्हणाली, बाबांनी दक्षिणेतून निवडणूक लढवावी. कऱ्हाडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेहेरबानीचा विकास आम्हाला नको आहे. आपण कराल तो विकास आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आपणच दक्षिणेतून लढावे. विद्याताई थोरवडे म्हणाल्या, पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व राज्याला दिशा देणारे आहे. त्यामुळे त्यांची येथे गरज आहे. माजी नगरसेवक अशोकराव पाटील म्हणाले, कऱ्हाडच्या शहरी व ग्रामीण भागाच्या विकासाला योग्य चालना देण्यासाठी आमदार चव्हाण यांच्यासारख्या दृष्ट्या नेत्याची गरज आहे. 

प्रदीप जाधव म्हणाले, आमदार चव्हाण यांनी प्रत्येकवेळी विकासाला महत्त्व दिले. त्यांच्या विकासात्मक दृष्टीने कऱ्हाड दक्षिणचा कायापालट झाला आहे. 
अजित पाटील-चिखलीकर म्हणाले, आमदार चव्हाण यांना विकासाचा वारसा आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा चालविणारा नेता म्हणून आमदार चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांचे नेतृत्व महत्त्वाचे आहे. 

जाकीर पठाण म्हणाले, मित्रपक्ष काय, कशी मदत करेल, याची गॅरंटी नाही. सातारा लोकसभेचा विचार करण्यापेक्षा बाबा आपण कऱ्हाड दक्षिणेतून लढावे. वैभव थोरात म्हणाले, कऱ्हाड दक्षिणेतील विकास करण्यासाठी आमदार चव्हाण यांच्यासारख्या सुदृढ नेतृत्वाची गरज आहे.

तानाजी चवरे म्हणाले, कऱ्हाड दक्षिणेतील वाघ म्हणून आमदार चव्हाण यांच्याकडे पाहणे गरजेचे आहे. त्यांनी पाच वर्षांत व मुख्यमंत्री असताना केलेला विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. तोच विकास पुढे कायम ठेवण्यासाठी आता बाबांचीच दक्षिणेतील लोकप्रितिनिधी म्हणून गरज आहे. सचिन काकडे म्हणाले, आमदार चव्हाण यांनी गटा-तटाचा विचार न करता विकास केला आहे. विकास काय असतो, ते खऱ्या अर्थाने दक्षिणेत दिसून आले आहे. 

नानांचे नाव घेताच संताप 

मेळाव्यात आपले मनोगत व्यक्त करताना नामदेव पाटील यांनी आमदार आनंदराव पाटील यांच्या नावाचा केवळ उल्लेख केला. मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी मोठा गलका करत, आम्हाला त्यांच्याबद्धल काही ऐकायचे नाही. त्यांचे नावही आता घेऊ नका, अशा जोरदार आरोळ्या उठल्या. त्यामुळे नामदेव पाटील यांना त्यांचे म्हणणेही नीट मांडता आले नाही. काही काळ गोंधळ झाला. त्यावेळी मनोहर शिंदे यांनी उठून ते काय म्हणतात, ते ऐका असे सुचवल्यावर पाटील यांनी आपले म्हणणे मांडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Say Dilse .... Prithviraj Baba again