विविध योजना गावपातळीवर पोचविणार - शौमिका महाडिक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

कोल्हापूर - पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सोपविलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यातील विविध योजना गावपातळीवर पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही नूतन अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांनी दिली. भाजप कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने भाजप कार्यालयात सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई होते. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्या प्रथमच भाजप कार्यालयात आल्या होत्या. 

त्या म्हणाल्या, ‘‘जिल्हा परिषद अध्यक्षपद महत्त्वाचे आहे. विकासकामांचे नियोजन करून त्यासाठी लागणारा जास्तीत जास्त निधी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांतून मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न राहील.’’
जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई म्हणाले, ‘‘१९८० मध्ये स्थापन झालेल्या भाजपच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. ग्रामीण भागात वर्षानुवर्षे भाजपचा विचार आणि काम रुजवण्यात कार्यकर्त्यांनी हातभार लावला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक या माध्यमातून होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या सक्षम नेत्यामुळे जिल्ह्याचे प्रश्‍न मार्गी लागत आहेत. सौ. महाडिक यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न जलदगतीने निकालात काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सब का साथ, सब का विकास’ या विचाराला बळकटी द्यावी.’’

माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेच्या निकालामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. केंद्र आणि राज्याच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवणे ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे.’’

जिल्हाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, ‘‘पालकमंत्री पाटील यांच्यामुळे जिल्ह्यात विविध योजना, प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळेच जनतेने जिल्हा परिषद निवडणुकीत इतिहासात प्रथमच भाजपला साथ आणि सत्ता दिली आहे. कार्यकर्त्यांनी बुथ रचनेच्या माध्यमातून भाजप संघटनात्मक विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.’’

जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी प्रास्ताविक केले. विजय जाधव यांनी आभार मानले. या वेळी सुभाष रामुगडे, अशोक देसाई, संतोष भिवटे, शिवाजी बुवा, अमोल पालोजी, नगरसेवक अजित ठाणेकर, उमा इंगळे, सविता भालकर, अश्‍विनी बारामते, वैशाली पसारे, प्रभावती इनामदार, प्रभा टिपुगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: schemes village level to convey