शिष्यवृत्तीतील प्रज्ञावंत घटले?

विशाल पाटील
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सातारा - राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञावंत मुलांचा शोध घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना १९५४ पासून सुरू केली. मात्र, गेल्या पाच वर्षांत शिष्यवृत्ती योजनेला घरघर लागली आहे. २०१४ च्या तुलनेत प्रविष्ठ होणाऱ्यांचे प्रमाण निम्म्याने घटले आहे, तर निकाल तीन ते चार पटीने खालावला आहे. शिक्षण विभागावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.

सातारा - राज्य परीक्षा परिषदेतर्फे प्रज्ञावंत मुलांचा शोध घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी शिष्यवृत्ती योजना १९५४ पासून सुरू केली. मात्र, गेल्या पाच वर्षांत शिष्यवृत्ती योजनेला घरघर लागली आहे. २०१४ च्या तुलनेत प्रविष्ठ होणाऱ्यांचे प्रमाण निम्म्याने घटले आहे, तर निकाल तीन ते चार पटीने खालावला आहे. शिक्षण विभागावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा म्हटले, की हुशार विद्यार्थी त्या परीक्षेस बसवायचे आणि त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करायचे, असा शिरस्ताच जणू काही प्राथमिक, पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये होता. मात्र, आता त्याला आहोटी लागल्याची स्थिती आहे. परीक्षा परिषदेचे तत्कालीन सहायक आयुक्‍त व सध्याचे साताऱ्याचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी प्रथमच ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे मागविण्याची पद्धत राबविली. राज्यभरात त्यांनी पुढाकार घेऊन कामकाज केल्याने घटतेप्रमाण थांबून २०१४-१५ मध्ये तब्बल १६ लाख विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवेदन भरले. मात्र, आता याला पुन्हा उतरती कळा लागली आहे. 

चालू शैक्षणिक वर्षात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) १७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणार आहे. यासाठी अर्ज करण्याकरिता १९ ऑक्‍टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंतचा अवधी दिला होता. त्यास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

यामुळे घटली संख्या 
 पाचवी, आठवीसाठी शिष्यवृत्ती लागू केली 
 जिल्हा परिषदेच्या शाळा कमी झाल्या 
 शिक्षक, विद्यार्थी, पालकांची अनास्था 
 खासगी व्यवस्थापनेचे शिष्यवृत्तीकडे दुर्लक्ष

अशी आहे स्थिती 
वर्ष              वर्ग       विद्यार्थी     वर्ग        विद्यार्थी 

२०१४          चौथी    ८,९०,७३९    सातवी    ६,७८,७८६ 
२०१५         चौथी    ९,२७,३५८     सातवी    ६,६६,९३१ 
२०१७         पाचवी    ५,४५,९४०    आठवी    ४,०३,३५९ 
२०१८         पाचवी    ४,८८,८८६    आठवी    ३,७०,२४३ 
चालू वर्षी    पाचवी    ४,५०,४८२    आठवी    २,९७,५१३

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ११ ते २० डिसेंबरदरम्यान विलंब शुल्क आणि २१ ते ३१ डिसेंबरदरम्यान अतिविलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. अतिविशेष विलंब शुल्कासह १५ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. स्पर्धा परीक्षाचा पाया, विद्यार्थ्यांची चौकसबुद्धी वाढावी, यादृष्टीने परीक्षेकडे सकारात्मक पाहावे.
- राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी, सातारा 

Web Title: Scholarship Child Education