साेलापूर : शाळेचा स्लॅब कोसळला, जीवितहानी टळली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मोडनिंब येथील आदर्श नगर भागातील प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीच्या स्लॅबचा काही भाग आज सकाळी शाळा भरताना कोसळला, सुदैवाने यामध्ये काेणतीही जीवितहानी झाली नाही.

मोडनिंब (जि. साेलापूर) : मोडनिंब येथील आदर्श नगर भागातील प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीच्या स्लॅबचा काही भाग आज सकाळी शाळा भरताना कोसळला, सुदैवाने यामध्ये काेणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, आदर्श नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथीचे वर्ग भरतात. ३० विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी शाळेची वर्गखोली  उघडताच स्लॅबचा काही भाग कोसळला. या घटनेमुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागले. या ठिकाणी तीन वर्गखोल्या आहेत. यापैकी दोन वर्गखोल्यांचे बांधकाम अत्यंत धोकेदायक स्थितीत आहे.

दोन्ही वर्ग खोलीचे स्लॅब फुगले असून, कधी कोसळतील हे सांगता येत नाही. परिणामी अत्यंत धोका निर्माण झाला आहे. बऱ्याचदा या वर्गामध्ये पावसाचे पाणी देखील साठत आहे.
वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध आहे. चार महिन्यांपूर्वी या वर्गखोल्यांची पाहणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली होती. वेळेवर दुरुस्ती न केल्याने स्लॅब  कोसळण्याची घटना घडली. संबंधितांनी तातडीने वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अशी मागणी पालक व ग्रामस्थांतून होत आहे.

शाळेसाठी तीन वर्ग खोल्या असून, यापैकी एक वर्गखोली चांगली आहे त्यामध्ये तांदूळ व इतर साहित्य ठेवले आहे. सध्या पावसाळा असल्याने वर्गखोल्यांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. शाळेच्या इमारतीची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जूनमध्ये पाहणी केली आहे. - गोरख माने, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आदर्श नगर मोडनिंब.

आम्ही शाळेच्या धोकादायक असणाऱ्या वर्गखोल्यांची पाहणी केली होती. ज्या वर्गखोलीचे बांधकाम चांगले आहे त्या वर्गात विद्यार्थी बसविण्याची सूचना संबंधित शिक्षकांना केली होती. धोकादायक इमारतीची दुरुस्ती तातडीने सुरू करणार आहे. या कामासाठी निधी उपलब्ध आहे. - दत्तात्रेय सुर्वे, सरपंच मोडनिंब.

शाळेच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला वर्गखोल्या दुरुस्त करण्यासंदर्भात मुख्याध्यापकांनी जूनमध्येच पत्र दिले होते. वेळेवर दुरुस्ती केली असती तर ही घटना घडली नसती. आता तरी संबंधितांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी वर्गखोल्या तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. - भालचंद्र सुर्वे, शिक्षण प्रेमी सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school wall collapse in solapur