स्कूल बस तपासणी अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

सातारा - शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी स्कूल बसची फिटनेस तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे. तपासणी न झाल्यामुळे स्कूल बसच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे वृत्त सकाळने प्रसिद्ध केले होते.

सातारा - शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी स्कूल बसची फिटनेस तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे. तपासणी न झाल्यामुळे स्कूल बसच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे वृत्त सकाळने प्रसिद्ध केले होते.

स्कूल बसमधून होणाऱ्या विद्यार्थी वाहतूक संदर्भात नागपूर उच्च न्यायालयात २०१२ मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूल बसच्या फिटनेसची तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मागील दोन वर्षांत परिवहन विभागाने शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूल बसची एकत्रित तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे स्कूल बसची तपासणी होत होती. मात्र, या वर्षी परिवहन विभागाला न्यायालयाच्या या निर्देशाचा विसर पडला. 

परिणामी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कूल बसची तपासणीच झाली नाही; पण आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातच एका ठिकाणी तीन चाकावर स्कूल बस चालविली जात असल्याचे समोर आले. यापूर्वीही स्कूल बसच्या दुर्घटनांचे प्रकार समोर आले आहेत. त्यातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत आज सकाळने वृत्त प्रसिद्ध केले होते.

या वृत्ताची दखल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी घेत स्कूल बसची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिना अखेरपर्यंत सर्व स्कूल बसची तपासणी करण्यात येईल, असे ते म्हणाले. स्कूल बस चालकांनी वाहनाच्या तपासणीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याच आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्हा समितीची बैठक लवकरच
विद्यार्थी वाहतुकीतील अडचणी संदर्भात धोरण ठरविण्यासाठी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्कूल बस समिती काम करते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी त्यांचे सदस्य सचिव आहे. या समितीची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात धोरण ठरविण्यात येईल, असे श्री. धायगुडे यांनी सांगितले.

Web Title: school bus cheaking