कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी शाळा बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

भाजप सरकारच्या काळात कधी नाही इतके शिक्षण क्षेत्र अडचणीत आले आहे. संच मान्यतेतील त्रुटी. शिक्षक, शिक्षकेत्तर भरतीवरील बंदी. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍न, विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा प्रश्‍न असे प्रश्‍न रेगांळले आहेत.

कोल्हापूर - राज्य शासनाच्या अशैक्षणिक धोरणाच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी (ता. 20) जिल्ह्यातील सर्व प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा बंद राहणार आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा देत असल्याचे शैक्षणिक व्यासपीठाच्या पदाधिकाऱ्यांनी आज सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास आगामी दहावी, बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला. 

भाजप सरकारच्या काळात कधी नाही इतके शिक्षण क्षेत्र अडचणीत आले आहे. संच मान्यतेतील त्रुटी. शिक्षक, शिक्षकेत्तर भरतीवरील बंदी. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍न, विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा प्रश्‍न असे प्रश्‍न रेगांळले आहेत. शासनाने आश्‍वासन देण्यापलीकडे काही केलेले नाही. दरवर्षी आंदोलनामुळे विद्यार्थी वेठीस धरले जाऊ नये या उद्देशाने संस्थाचालक तसेच शिक्षकांनी आजपर्यंत संयम पाळला. आता मात्र सर्व बाबी हाताबाहेर जाऊ लागल्या आहेत. सेल्ली काढणे, शालेय पोषण आहाराची जबाबदारी यामुळे अशैक्षणिक कामांचा ताण वाढतो आहे.

शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीवरील बंदीमुळे शाळेत घंटा कुणी द्यायची असा प्रश्‍न आहे. वेतनेत्तर अनुदान थकीत आहे. शिक्षक भरतीचे अधिकारी शिक्षण आयुक्तांना दिले गेले आहेत. संस्थाचालक आणि शिक्षकांना नाममात्र ठेवले आहे. शिक्षणात महसूली व्यवस्था आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. निषेधार्थ शुक्रवारी जिल्हातील शाळा बंद ठेवत आहोत. तत्पुर्वी बुधवारी आणि गुरूवारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्थाचालक काळ्या फिती लावून काम करणार आहेत. यातून सुधारणा न झाल्यास दहावी, बारावी परीक्षेवर नाईलाजाने बहिष्कार टाकावा लागेल. 

जिल्ह्यातील सुमारे अडीच हजाराहून अधिक शाळातील शिक्षक बंदममध्ये सहभागी होतील. या दिवशी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होईल. तालुक्‍याच्या ठिकाणी तहसिलदांराना निवेदन दिले जाईल. 

पत्रकार परिषदेस शिक्षण क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तीमत्व डी. बी. पाटील. व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, प्रभाकर आरडे, भरत रसाळे, एस. जी. तोडकर, संतोष आयरे, राजेश वरक, गिरीश फोंडे आदि उपस्थित होते.

Web Title: school closed in kolhapur district