शाळांसह शासकीय कार्यालयांत योग दिन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

सातारा - राज्यातील सर्व शाळांबरोबर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आंतररराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश आज क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, योग दिन हा केवळ एक दिवसापुरता न होता तो योग महोत्सव ठरावा यासाठी प्रयत्न करावेत, असे मंत्री तावडे यांनी स्पष्ट केले आहे. 

सातारा - राज्यातील सर्व शाळांबरोबर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आंतररराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश आज क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, योग दिन हा केवळ एक दिवसापुरता न होता तो योग महोत्सव ठरावा यासाठी प्रयत्न करावेत, असे मंत्री तावडे यांनी स्पष्ट केले आहे. 

येत्या २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. त्यानिमित्त आज मंत्री तावडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये मंत्री तावडे यांनी उपस्थितांकडून माहिती घेत, काही सूचना केल्या. मंत्री तावडे म्हणाले, ‘‘संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केलेला आहे. सुमारे पाच हजार वर्षांहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने दिलेली देणगी आहे.

व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे. चौथ्या जागतिक योगादिनाचे आयोजन येत्या २१ जूनला देशात करण्यात येणार आहे. या उपक्रमात राज्यातील युवा पिढी तसेच सर्वसामान्य घटकांना मोठ्या संख्येने सामावून घ्यावे. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, उत्सव मंडळे, नेहरू युवा केंद्रे, विद्यापीठे यामधील विद्यार्थ्यांकडून तसेच एन. एस. एस., युवा संघटनांद्वारे योगासंबंधी कार्यक्रम आयोजित करावेत. योग दिन आयोजनासाठी प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनास कैवल्यधाम लोणावळा (पुणे), दि योगा इन्स्टिट्यूट सांताक्रूझ, (मुंबई), रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट (पुणे) या तीन योग संस्था सहकार्य करणार आहेत. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व शिक्षण विभागाने नियोजनात्मक कार्यवाहीस प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शाळांना योगदिनासंदर्भात परिपत्रक पाठविण्यात आले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये योग दिन साजरा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावू लागले आहेत.

क्रीडा संकुलात १८ रोजी शिक्षकांना योगाचे धडे 
येत्या १८ जूनला छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जिल्ह्यातील शिक्षकांना योगाचे धडे दिले जाणार आहेत. त्यामध्ये १० ते १२ या वेळेत सातारा, जावळी, कोरेगाव, वाई, महाबळेश्‍वर, खंडाळा तालुक्‍यांतील (ब्लॉकनुसार) तसेच १२ ते दोन यावेळेत पाटण, कऱ्हाड, माण, खटाव, फलटण तालुक्‍यांतील (ब्लॉकनुसार) एका प्राथमिक व माध्यमिक शिक्षकास योगाचे प्रशिक्षण मिळणार आहे. संबंधित प्रशिक्षित शिक्षकांनी त्यांच्या त्यांच्या ब्लॉकनुसार अन्य शिक्षकांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे.

Web Title: school government office yog day vinod tawde