दरवर्षी पावसाळ्यात शाळेला सुटी !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

दरवर्षी पावसाळ्यात किमान 20 ते 25 दिवस विद्यार्थी घरीच थांबतात.

ढेबेवाडी ः शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील ओढ्यांसह नदीवरील छोटे पूल पाण्याखाली जात असल्याने आणि पूल नसलेल्या ठिकाणी ओढ्यांच्या पाण्याला उतार मिळत नसल्याने जिंती (ता. पाटण) येथील माध्यमिक विद्यालयात डोंगरातील वाड्यावस्त्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर पावसाळ्यात घरी बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. प्रतिवर्षी या विद्यालयातील निम्म्याहून अधिक विद्यार्थी पावसाळ्यातील किमान 20 ते 25 दिवस घरीच अडकून राहात आहेत. 

जिंती येथील माध्यमिक विद्यालयात जिंतीसह त्या परिसरातील सावंतवाडी, शिंदेवाडी, धनावडेवाडी, जितकरवाडी, भातडेवाडी, म्हाइंगडेवाडी, हौदाचीवाडी, हेलोबाचीवाडी, मोडकवाडी, सातर, म्हाळुंगेवाडी, सुतारवाडा, नवीवाडी आदी दुर्गम वाड्यावस्त्यांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यात मुलींची संख्या जास्त आहे. पावसाळ्यात शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील ओढ्यांसह नदीवरील छोटे पूल पाण्याखाली जात असल्याने आणि पूल नसलेल्या ठिकाणी ओढ्यांच्या पाण्याला उतार मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना घरी बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. शाळेजवळच असलेला वांग नदीवरील पूल कमी उंचीमुळे पावसाळ्यात वारंवार पाण्याखाली जातो. त्यावरून ये-जा करताना आतापर्यंत अनेक पादचाऱ्यांसह जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात अचानक पुलावर पाणी आल्यावर शिक्षकांवर विद्यार्थ्यांना घरी पोचविण्याची वेळ येते. पावसाळ्यात नदीसह ओढे भरून वाहत असल्यामुळे विद्यार्थी शाळेत येत नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात किमान 20 ते 25 दिवस ते घरीच थांबतात. उघडिपीनंतर त्यांच्यासाठी जादा तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. वाड्यावस्त्यांकडे पुलांसह बारमाही वाहतुकीच्या रस्त्याचे जाळे विणल्याशिवाय आणि जिंती जवळच्या पुलाची उंची वाढवल्याशिवाय ही समस्या सुटणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School holidays in the rainy season !