धोकादायक शालेय विद्यार्थी वाहतूक, पोलिसांचे दुर्लक्ष

तात्या लांडगे
बुधवार, 20 जून 2018

शाळा सुरू होताच खाजगी वाहनांमधून बेकायदा शालेय विद्यार्थी वाहतूक सुरु झाली आहे. अनेक वाहनचालक विद्यार्थी वाहनातून प्रवास करताना मोबाईलवर बोलतात. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्‍यात आल्याचे दिसून येते.

सोलापूर- शाळा सुरू होताच खाजगी वाहनांमधून बेकायदा शालेय विद्यार्थी वाहतूक सुरु झाली आहे. अनेक वाहनचालक विद्यार्थी वाहनातून प्रवास करताना मोबाईलवर बोलतात. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्‍यात आल्याचे दिसून येते.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. परंतु, सद्यस्थिती पाहता या व्यवस्थापन समित्या कागदावरच असल्याचे दिसते. काही ठिकाणी तर अनेक रिक्षा, स्कूल बस अथवा खाजगी वाहनांमधून वाहतूक पोलिसांसमोरुन क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नेले जातात. पैशाची बचत होते म्हणून अनेक पालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असूनही त्या वाहनातून आपल्या मुलाला शाळेत पाठवतात. त्यामुळे अवैध वाहतुकीला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या वाहनांना जीपीएस लावण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. त्याअंतर्गत येत्या काही वर्षात सर्वच वाहनांना जीपीएस लावले जाणार आहेत. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस लावून त्याचे नोटिफिकेशन त्या वाहनातील विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईल पाठवून, त्या स्कूल बसचे ट्रॅकिंग करता यावे, अशी योजना आरटीओच्या माध्यमातून करण्याची गरज आहे. 

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस अथवा अन्य वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अनेक शाळांच्या स्कूल बस, रिक्षा शाळेच्या आवाराबाहेर उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे शक्‍य त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चढ-उतार करण्याकरिता सुरक्षित ठिकाणी मर्यादित वेळेपुरती पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी वाहतूक पोलीस, शालेय व्यवस्थापन व महापालिका यांनी संयुक्‍त आराखडा तयार करण्याची गरज आहे.

Web Title: school student traveling Dangerous, police also neglect