शाळांना ३८ शिक्षकांची प्रतीक्षा

अमर पाटील
मंगळवार, 3 जुलै 2018

बांबवडे - शाहूवाडी तालुक्‍यातील प्राथमिक शाळांसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे ३९ शिक्षक रुजू झाले आहेत. मात्र, अजूनही ३८ शिक्षकांची प्रतीक्षा आहे.

बांबवडे - शाहूवाडी तालुक्‍यातील प्राथमिक शाळांसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे ३९ शिक्षक रुजू झाले आहेत. मात्र, अजूनही ३८ शिक्षकांची प्रतीक्षा आहे.

तालुक्‍यातून ७७ शिक्षक बदली होऊन जिल्ह्याबाहेर गेले होते. या रिक्त पदांवर अद्यापही बदली शिक्षक मिळाले नसल्याने शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरीही तालुक्‍यातील २४ पेक्षा जास्त शाळा बंद अवस्थेत होत्या. अन्य शिक्षकांना त्या शाळेत जाण्याचे आदेश सभापती स्नेहा जाधव आणि उपसभापती दिलीप पाटील यांनी शिक्षण विभागामार्फत काढले. त्यामुळे अन्याय झाल्याची भावना या शिक्षकांची झाली. सभापती स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून त्वरित शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी केली. रिक्त जागी शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत शेजारील शाळेतील शिक्षकांना रिक्त जागेवर रुजू होण्याचे आदेश दिले. 

शाहूवाडी तालुक्‍यात एकूण २७४ प्राथमिक शाळा आहेत, तर तालुक्‍यात एकूण ८८६ शिक्षक पदे असून, त्यापैकी ७१० शिक्षक कार्यरत आहेत. १० टक्के हे सामाजिकीकरण म्हणजे ९० शिक्षक रिक्त स्वरूपात आहेत. मंजूर पदांपैकी १९ जादा पदे आहेत, तर १६७ रिक्त पदे गृहीत धरल्यास त्यामध्ये ९ मुख्याध्यापक, ४३ पदवीधर व ११५ अध्यापक अशी स्थिती आहे. 

या १६७ पैकी सामाजिकीकरणासाठी ९० शिक्षक रिक्त राहिले तर ७७ शिक्षकांपैकी ३९ शिक्षक ऑनलाईन प्रणालीद्वारे रुजू झाले. अजूनही ३८ शिक्षकांची गरज आहे.

तालुक्‍यातील २७४ प्राथमिक शाळांपैकी काही शाळांत अध्यापक नसल्याने त्याठिकाणी इतर शाळांतील अध्यापक रुजू केले. ३९ शिक्षक नवीन रुजू झाले आहेत. उर्वरित शिक्षक रुजू होण्यासाठी तातडीने पाठपुरावा करून हा प्रश्‍न सोडवला जाईल. पालकांनी व विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता मुलांना शाळेत 
पाठवावे. 
- दिलीप पाटील, उपसभापती, शाहूवाडी.

Web Title: School Teacher