esakal | गल्ल्या सील आणि महामार्ग मोकाट... या जिल्हात धोका वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

Sealed  streets and clear highway... The danger increased in this district

गावे बंद आहेत...शहरातल्या गल्ल्या सील आहेत...पण पुण्या-मुंबईहून धोका वाढेल अशी वाहतूक कोणाच्या दुर्लक्षामुळे सुरू आहे? जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असतानाच दुसऱ्या बाजूला बाहेरून येणाऱ्यांमुळे "कोरोना' फैलाव होत असल्याचे गंभीर चित्र आहे.

गल्ल्या सील आणि महामार्ग मोकाट... या जिल्हात धोका वाढला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गावे बंद आहेत...शहरातल्या गल्ल्या सील आहेत...पण पुण्या-मुंबईहून धोका वाढेल अशी वाहतूक कोणाच्या दुर्लक्षामुळे सुरू आहे? जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असतानाच दुसऱ्या बाजूला बाहेरून येणाऱ्यांमुळे "कोरोना' फैलाव होत असल्याचे गंभीर चित्र आहे.

"लॉक-डाऊन' चे नियम तोडून खेराड-वांगी व शिराळा येथे आलेल्या काही जणांमुळे अवघी गावे आणि शहरे डेंजर झोनमध्ये येत आहेत, शासन एवढी दक्षता घेत असताना हा ढिसाळपणा कोणी केला, याची चौकाशी होऊन कठोर कारवाईची गरज आहे.

वाधवान कुटुंबाचा महाबळेश्‍वर प्रवास केवढा गाजला. यामध्ये मोठी कारवाई देखील झाली. मात्र त्यानंतरही मुंबईच्या सायन हॉस्पिटलमधून एक मृतदेह तपासणी होण्यापूर्वीच सांगली जिल्ह्यात आला कसा, आणि त्याहून मोठा धक्‍का म्हणजे या मृतदेहाच्या मागून आणखी एक गाडी पोलिस यंत्रणेला चकाव देत पोहोचली. या पाठोपाठ शिराळा तालुक्‍यात मुंबई आलेल्या प्रवाशांनी तर कळसच केला. आता सहकार व कृषिराज्य मंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी सायन हॉस्पिटलच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण यापुढे असे धोको वाढणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनीदेखील आता जिल्ह्यात असे आणखी धोके वाढणार नाहीत यासाठी या दोन घटनांबाबत संबंधित यंत्रणांची कसून चौकशी करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. 

प्रत्यक्षात जिल्ह्यात एकमेव रुग्ण आढळून आला तो देखील सांगलीत, पण त्याचाही प्रवास आढळून येत नसल्याने प्रशासन चक्रावले आहे. मात्र आतापर्यंत जिल्ह्यातील कोरनाचा आढावा घेतला असता अन्य सर्व रुग्णांचे कनेक्‍शन बाह्य भागाशी असल्याचे स्पष्ट आहे. इस्लामपूर येथे सौदी अरेबियातून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर हा आकडा 26 वर गेला. मुळात त्यांची तपासणी विमानतळावरच झाली असती आणि त्यांना त्याचठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले असते, तर पुढील सर्व धोका टळला असता. त्यानंतर तबलीगी कनेक्‍शन उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली. वीसवर जणांची तपासणी करण्यात आली,

त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले हे दिलासादायक ठरले. परंतु त्यानंतर पुणे-मुंबईतून सांगलीत येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. मुंबई येथे एका तरुणाचा मृत्यू झाला. शववाहिकेमागून खेराडे-वांगी येथे चौघाजणांनी प्रवेश केला. त्याचा गैरफायदा घेतला आणि त्यांना प्रवेश देण्यात आला. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी वैद्यकीय परवान्याचा गैरवापर करून निगडी (ता. शिराळा) येथे मुंबईतून दोघे आले. त्यातील एका महिलेस कोरोनाची लागण झाली, आणि शिराळा तालुका हाय अलर्ट झाला. या दोन्ही घटनानंतर जिल्ह्यातील लोकांपुढे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे, की जिल्ह्यातील सीमा भाग लॉक असताना त्यांना प्रवेश मिळालाच कसा? महसूल आणि पोलिस प्रशासनाला सर्व चोर वाटा माहीत आहेत, या वाटा त्यांनी बंद केल्या की खुल्या ठेवल्या आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. 

जिल्ह्यातील जत तालुक्‍याचा संपर्क विजापूर, तर मिरज तालुक्‍याचा संपर्क रायबाग भागाशी येतो. तसेच शिराळा आणि इस्लामपूर या तालुक्‍यांचा थेट संपर्क सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याशी आहे. त्यात इस्लामपूर भागाचा संपर्क कऱ्हाड (सातारा) यांच्याशी नजीकचा आहे. निदान जिल्हा सीमेवर बंदोबस्त कडेकोट असाव, अशी सांगलीकरांची अपेक्षा आहे. 

वैद्यकीय परवान्याचा गैर वापर

सांगली जिल्ह्यातील सीमेवर परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांवर देखरेखीसाठी पोलिसांचा चोख पहारा ठेवला आहे. त्याठिकाणी वैद्यकीय कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. यातील शिराळ्यात प्रवेश केलेल्यांनी वैद्यकीय परवान्याचा गैर वापर केला आहे. अन्य लोक मात्र चकवा देत जिल्ह्यात प्रवेश केल्याचे दिसते आहे. यापुढील काळात जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येईल. मी स्वतः जातीने या भागांची तपासणी करून लक्ष घातले आहे.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली 

परवाने देण्यासाठी आणखी कडक नियमावली

लॉकडाऊन करण्यात आल्यापासून जिल्ह्यातील सीमा भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चोवीस तास पोलिसांचा बंदोबस्त त्याठिकाणी असतो. शिराळा भागात प्रवेश केलेल्यांनी वैद्यकीय परवान्याचा गैरवापर करून प्रवेश केला. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अत्यावश्‍यक कामासाठी परवाने मागितले जातात, मात्र लोक त्याचा गैरवापर करताना दिसत आहेत. या पुढील काळात परवाने देण्यासाठी आणखी कडक नियमावली केली जाईल. तसेच भागातील बंदोबस्तांची मी स्वतः पाहणी केली असून त्याचा दिवसागणिक आढावा घेत आहे.
- सुहैल शर्मा, पोलिस अधीक्षक, सांगली