पोराच्या शोधासाठी मातेकडून देवाला दहा किलो साखर आणि पोतंभर नारळ!

पोराच्या शोधासाठी मातेकडून देवाला दहा किलो साखर आणि पोतंभर नारळ!

आरग - मारुती अवघा दोन-तीन वर्षांचा असतानाच नवऱ्याने सोडून दिले. मूक-बधिर मारुतीला घेऊन विमल कोरुचे (कोरबू) कुरुंदवाडहून माहेरी आरग येथे आल्या. कसाही असला तरी म्हातारपणासाठी मारुतीच आधार या आशेवर त्याचं पालनपोषण केलं. तिशी संपली तरी मूक-बधिर असल्याने मारुतीचे दोनाचे चार होऊ शकले नाहीत. तरीही मायलेकाचे जग गरिबीतही समाधानी होते.

दोन वर्षांपूर्वी एके दिवशी मंगसुळी येथे खंडोबाला देवदर्शनासाठी म्हणून मारुती गेला; त्यानंतर आजतागायत परतलाच नाही. त्याच्या शोधासाठी विमल यांनी अख्खा जिल्हा पालथा घातला. तो नक्की परतेल या आशेने त्यांची पायपीट दोन वर्षांनंतरही सुरूच आहे.

आरगमध्ये लक्ष्मीवाडी रस्त्यावर बहिणीच्या कुटुंबाशेजारी छोट्याशा घरात विमल दिवस काढताहेत. मारुतीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारी मिरज, कागवाड येथील पोलिस ठाण्यांत नोंद केल्यात. पोलिसांनी नेहमीचा सोपस्कार म्हणून दोन-चार दिवस तपास केला; त्यानंतर ‘पोरगा येईल आपणहून’ असे सांगत निरक्षर विमल यांची बोळवण केली. दुसऱ्याच्या शेतात राबून खाणारे मायलेक एकमेकाच्या जीवांचे सोबती होते.

मारुतीच्या अचानक बेपत्ता होण्याने विमल सैरभैर झाल्यात. पोराचे पाच-पंचवीस फोटो काढून गावोगावी वाटलेत. कधीतरी कोणीतरी सांगते ‘जतला मारुती दिसला’ म्हणून; लगेच रोजगार बुडवून विमल जतला धावताहेत. या शोधमोहिमेत त्यांनी अख्खा जिल्हा पालथा घातलाय. कर्नाटकातील अथणी, चिक्कोडी तालुके धुंडाळलेत. पोटाला लागतं म्हणून कसाबसा रोजगार करताहेत; अन्यथा मारुतीचा थांग लावायचा हेच त्यांचं सध्याचं एकमेव काम झालंय. 

देवदेवस्की, ज्योतिषी सारे उपाय झालेत. जवळचे-लांबचे सारे पाहुणे-रावळे संपलेत. मारुतीचा पत्ता नाही. त्या म्हणतात, ‘मारुतीच्या शोधासाठी देवादिकांच्या उंबऱ्यावर दहा किलो साखर आणि पोतंभर नारळ आजवर ठेवलेत; ‘तो’ मायलेकराची गाठ घालून देईल याची खात्री आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com