प्राथमिक शिक्षण संचालनालयाला 'टीईटी' नसलेल्या गुरुजींचा शोध 

संतोष सिरसट
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या गुरुजींचा शोध प्राथमिकच्या शिक्षण संचालनालयाने सुरू केला आहे. अशा गुरुजींची माहिती त्यांनी राज्यातील प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांकडून मागितली आहे. 

सोलापूर- राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या परंतु, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या गुरुजींचा शोध प्राथमिकच्या शिक्षण संचालनालयाने सुरू केला आहे. अशा गुरुजींची माहिती त्यांनी राज्यातील प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्यांकडून मागितली आहे. 

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराची (आरटीई) अंमलबजावणी राज्यात एक एप्रिल 2010 पासून सुरू झाली आहे. 'आरटीई' मधील कलम 23 अन्वये शिक्षकांच्या पात्रता निश्‍चित करण्याबाबतची तरतूद आहे. त्यानुषंगाने शासनाने 13 फेब्रुवारी 2013 ला निर्णय राज्यातील शिक्षणाचे स्तर निश्‍चित केले आहेत. त्याचबरोबर 2016 मध्ये शैक्षणिक अर्हताही निश्‍चित केली आहे. शासनाने शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे, असे असतानाही राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना नियुक्‍त्या दिल्या आहेत. याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल झाली आहे. "टीईटी' परीक्षा उत्तीर्ण नसतानाही राज्यात किती शिक्षकांना नियुक्‍त्या दिल्या गेल्या आहेत, याची माहितीच शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर अशा गुरुजींची माहिती मागण्याची धडपड शिक्षण विभागाने सुरू केली आहे. शिक्षण विभागाने मागितलेल्या माहितीमध्ये संबंधित शिक्षकाला वैयक्तिक मान्यता दिलेली तारीख, नियुक्तीच्या वेळी 'टीईटी' उत्तीर्ण आहे की नाही. नियुक्तीनंतर 'टीईटी' उत्तीर्ण झाले आहेत का?, नियुक्तीनंतर 'टीईटी' उत्तीर्ण झाले असतील तर त्याचा दिनांक किती? ही सगळी माहिती शिक्षण विभागाने मागितली आहे. एकूणच 'टीईटी' नसलेल्या गुरुजींचा शोध घेण्याची मोहीम शिक्षण विभागाने सुरू केली आहे. 

शोध घेण्यासाठी वेळेचे बंधन 
'टीईटी' उत्तीर्ण नसलेल्या परंतु सेवेत असलेल्या गुरुजींचा शोध घेण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. या गुरुजींचा शोध घेऊन ती माहिती 16 ऑगस्टपर्यंत शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्याच्या सूचनाही प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Search for a teacher who have not TET to the primary education directorate