सोलापूरात मोदी दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असल्याचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली असल्याचे पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला येताना काडीपेटी, ज्वालाग्रही पदार्थ, पाण्याची बाटली, पिशवी, लेडीस पर्स अशा वस्तू सोबत घेऊन येऊ नये. अशा वस्तू सोबत आणणाऱ्या नागरिकांना सभेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही, असे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले. पोलिस आयुक्तालयाने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 12 जणांना नोटीस बजावली आहे. दौऱ्यावेळी गोंधळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी दोन हजारपेक्षा जास्त पोलिस सज्ज आहेत. मोदी यांचे हेलिकॉप्टर सकाळी पावणे अकरा वाजता होम मैदान येथे येईल. तेथून त्यांचा कॅन्वा डफरीन चौक, महापौर बंगला, रामलाल चौक, सरस्वती चौकमार्गे पार्क स्टेडिअमवर येईल. मुख्यमंत्री, राज्यपाल व इतर व्हीआयपी विमानतळावरून होटगी रोड, सात रस्ता, डफरीन चौक मार्गे पार्क स्टेडिअम येथे येतील. पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सोलापुरात दाखल झाले आहेत. दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी रंगीत तालीम झाली.

पार्किंगची व्यवस्था 
रंगभवन येथील ईदगाह मैदान, जुनी मिल कंपाउंडमधील मैदान, संगमेश्‍वर महाविद्यालयाशेजारील मैदान, होम गार्ड मैदान इथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा शासकीय दौरा आहे. आंदोलनाच्या तयारीत असलेल्या विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही आधीच संवाद साधला आहे. व्हीव्हीआयपी दौऱ्यात गोंधळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Web Title: Security arrangements are ready in the wake of Modi's visit to Solapur