आम्‍हाला सुरक्षा पुरवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

कोल्हापूर - शासकीय रुग्णालये व डॉक्‍टरांना सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी निवासी डॉक्‍टर संघटनेसह (मार्ड) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मूक मोर्चा काढला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 

या वेळी डॉक्‍टर रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी लवकरच अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व प्रशासकीय प्रतिनिधींची बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना येथे राबवू, असे आश्‍वासन श्री. शिंदे यांनी दिले.  संपाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी रुग्णालये बेमुदत बंद ठेवण्याचा पवित्रा खासगी डॉक्‍टरांनी कायम ठेवला आहे.

कोल्हापूर - शासकीय रुग्णालये व डॉक्‍टरांना सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी निवासी डॉक्‍टर संघटनेसह (मार्ड) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मूक मोर्चा काढला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय शिंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. 

या वेळी डॉक्‍टर रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी लवकरच अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व प्रशासकीय प्रतिनिधींची बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना येथे राबवू, असे आश्‍वासन श्री. शिंदे यांनी दिले.  संपाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी रुग्णालये बेमुदत बंद ठेवण्याचा पवित्रा खासगी डॉक्‍टरांनी कायम ठेवला आहे.

राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांवर तसेच डॉक्‍टरांवर हल्ले होतात. त्यामुळे रुग्णालय व डॉक्‍टरांना सुरक्षा पुरवावी यासाठी राज्यातील निवासी डॉक्‍टरांनी प्रथम संप केला. त्याचाच भाग म्हणून सीपीआरमधील निवासी डॉक्‍टरांनी सामुदायिक रजा टाकून काम बंद आंदोलन सुरू केले. 

त्याला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेनेही पाठिंबा देत मोर्चात सहभाग घेतला. त्यानुसार सीपीआर आवारातून मोर्चाला सुरवात झाली. निवासी डॉक्‍टर व खासगी ॲलोपॅथिक डॉक्‍टर, होमिपॅथिक, आयुर्वेदिक, युनानी अशा विविध शाखांचे खासगी डॉक्‍टर ओपीडी बंद करून या मोर्चात सहभागी झाले. मोर्चा सीपीआर टाऊन हॉल चौक, खानविलकर बंगलामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.

येथे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण हेंद्रे व मार्डचे जिल्हाध्यक्ष डॉ. रामप्रसाद राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने श्री. शिंदे यांना निवेदन दिले.

या वेळी झालेल्या चर्चेत शासकीय रुग्णालय व खासगी रुग्णालयात अनेकदा रुग्णांचे नातेवाईक किंवा एखाद्या गटाकडून हल्ला होण्याच्या घटना राज्यभरात घडतात. कोल्हापुरात त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तरीही सीपीआरमध्ये सुरक्षा गरजेची आहे. अपघात विभाग असो किंवा अन्य वॉर्डात अनेकदा रुग्ण व त्यांचे नातेवाईक किंवा कार्यकर्ते गटागटाने जातात. काही वेळा गैरसमजातून वाद होतात. त्यामुळे असे प्रसंग टाळण्यासाठी सुरक्षितता अपेक्षित आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यासाठी रुग्णांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाइकांना पास द्यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावे, पोलिस चौकी असावी, अशा अपेक्षाही डॉक्‍टरांनी व्यक्त केल्या.   

यावर शिंदे यांनी समिती नियुक्त करू तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन उपाययोजना राबवू, असे सांगितले. 
डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. राजकुमार पाटील, भारत कोटकर, डॉ. प्रकाश संघवी, डॉ. मानसिंग घाटगे, डॉ. प्रताप वरुटे, डॉ. संदीप पाटील, डॉ. राहुल शिंदे, डॉ. माधवी लोकरे, डॉ. मिलिंद सबनीस, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. शिवराज देसाई आदी उपस्थित होते. 

संप चिघळल्याचे चित्र 
खासगीतर्फे सुरू असलेला राज्यव्यापी संप आज चिघळल्याचे चित्र आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सीपीआरमधील २०० निवासी डॉक्‍टरांना निलंबित केल्याच्या नोटिसा बजावल्या. संप मागे घ्या, असे वारंवार सांगूनही तो मागे घेतला नसल्याने नोटिसा दिल्या आहेत. अशात खासगी रुग्णालयांतील डॉक्‍टरांनी या संपाला पाठिंबा दर्शवत आजपासून खासगी रुग्णालयातील सेवा थांबविल्याने शहरातील रुग्ण सेवा विस्कळित झाली आहे. सीपीआरमधील ११५ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक डॉक्‍टरांनी आज तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष सेवा देत सीपीआरमध्ये गंभीर व जखमींवर उपचार सुरू केले आहेत.   

शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या 
सीपीआरमध्ये रोज १० ते २० शस्त्रक्रिया होतात. त्यातील नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. तर गंभीर रुग्ण व जखमींवरील शस्त्रक्रिया मात्र सुरू ठेवल्या आहेत. त्यानुसार प्रसूती विभागात आज चार सिझेरियनच्या शस्त्रक्रिया झाल्या तर अर्थोपेडिक विभागात तीन शस्त्रक्रिया झाल्याची माहिती शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांनी दिली.           

आयएमएच्या राज्यस्तरीय समिती केलेल्या आवाहनानुसार खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर बेमुदत संपात सहभागी आहोत. पण गंभीर अवस्थेतील रुग्ण व जखमींवर मात्र मानवतेच्या भावनेतून उपचार करीत आहोत. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली आहे. पण नियमित उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी मात्र सेवा बंद केली आहे. यात ॲलोपॅथिक, होमिओपॅथी, आयुर्वेदिक अशा डॉक्‍टरांचा सहभाग आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत संपात सहभागीच राहणार आहोत.
- डॉ. प्रवीण हेंद्रे

Web Title: security supply to doctor