"सीना कोळगाव' अद्यापही मायन्समध्येच; सोलापूर-उस्मानाबादमध्ये पाणीप्रश्न गंभीर

अण्णा काळे 
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

सोलापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांच्या शेतीला उपयुक्त ठरणारे सीना नदीवरील कोळगाव धरण अद्यापही मायन्समध्येच आहे. परतीच्या पावसाने एकीकडे नुकसान होत असताना या धरणात मात्र पाणीसाठा झालेला नाही.

करमाळा : सोलापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील गावांच्या शेतीला उपयुक्त ठरणारे सीना नदीवरील कोळगाव धरण अद्यापही मायन्समध्येच आहे. परतीच्या पावसाने एकीकडे नुकसान होत असताना या धरणात मात्र पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे या भागातील गावांवर अजूनही दुष्काळाचे सावट आहे. धरणात सध्या वजा 78.81 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात येथे तीव्र पाणीटंचाई होण्याचे संकेत आहेत. 

सीना कोळगाव धरणाच्या पाण्याचा करमाळा तालुक्‍यातील आवाटी, कोळगाव, हिसरे, फिसरे, हिवरे, मिरगव्हण, करंजे, भालेवाडी, दिलमेश्‍वर, अर्जुननगर, गौंडरे आदी गावांना उपयोग होतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील आलेश्‍वर, डोंजा, देऊळगाव, डोमगाव आदी गावांना येथील पाण्याचा उपयोग होतो. धरण 100 टक्के भरले तर उन्हाळ्यातही पाणी राहते आणि परिसरातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटतो. गेल्यावर्षी हे धरण 100 टक्के भरले नव्हते. त्यामुळे उन्हाळ्यात धरण कोरडे पडले होते. सीना नदीला मोठ्याप्रमाणात पाणी आले तरच हे धरण भरते. मात्र, यंदा सीना नदीला एकही मोठे पाणी आले नाही. परतीचा पाऊस झाल्यानंतर नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्‍यात जवळा भागात झालेल्या पावसाने नांनी नदीला पाणी आले होते. त्या पाण्यावर करमाळा तालुक्‍यातील तरटगाव बंधाऱ्यात पाणी आले. तेथील पाच दारे भरली आहेत. त्यातून काहीप्रमाणात खाली पाणी येऊन संगोबा येथील बंधाऱ्यात पाणी आले. मात्र, पाण्याचा वेग कमी असल्याने कोळगाव धरणात ते येऊ शकलेले नाही. त्यामुळे कोळगाव धरणक्षेत्रात अजूनही पाणी नसल्याने सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. 

बंधाऱ्यांची स्थिती... 
करमाळा तालुक्‍यात सीना नदीवर खडकी, तरटगाव, पोटेगाव व संगोबा येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. यातील तरटगाव आणि संगोबा बंधाऱ्यात पाणी आडवले आहे. मात्र, पाण्याची मोठ्याप्रमाणात गळती होत असल्याने पाणी राहील की नाही, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. सीना नदीला फक्त जवळा येथूनच पाणी आल्याने खडकीच्या बंधाऱ्यात पाणी आलेले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सुद्धा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पोटेगाव बंधाऱ्याची दुरुस्ती करणे आवश्‍यक होते. मात्र, याची दुरुस्ती झालेली नसल्याने हा बंधार असून सुद्धा नसल्यासारखा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

सीना नदीवरील सर्व बंधाऱ्याचे दरवाजे टाकण्याचे आदेश दिले आहेत. नदीला आलेले पाणी बंधाऱ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न आहे. ज्या बंधाऱ्याला गळती लागली आहे ती गळती थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- डी. एस. कोंडेकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग 

सीना कोळगाव अद्यापही मृत साठ्यातच आहे. आता उरलेल्या दिवसात धरण भरण्याची कोणतीही शक्‍यता वाटत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळातही या भागाला दुष्काळ जाणवणार आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजना, कुकडी किंवा अन्य मार्गाने सीना कोळगाव धरणात पाणी सोडले पाहिजे. 
- सतीश नीळ, अध्यक्ष, सीना कोळगाव धरण संघर्ष समिती, करमाळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seena Kolgaon dam still not getting full