महाराष्ट्राच्या रणजी संघात "नगरचा तोफखाना'

अमित आवारी
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

महाराष्ट्राच्या रणजी संघात नगरचा तोफखाना धडाडणार आहे. एका बाजूने द्रुतगती, तर दुसऱ्या बाजूने फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडविण्यासाठी सज्ज झालेत. अनुपमसोबत आता अझीम काझी हा अष्टपैलू नगरकर महाराष्ट्राची गोलंदाजी अन्‌ फलंदाजीची धुरा सांभाळणार आहे.

नगर ः महाराष्ट्राच्या रणजी संघात नगरचा तोफखाना धडाडणार आहे. एका बाजूने द्रुतगती, तर दुसऱ्या बाजूने फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडविण्यासाठी सज्ज झालेत. अनुपमसोबत आता अझीम काझी हा अष्टपैलू नगरकर महाराष्ट्राची गोलंदाजी अन्‌ फलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. या निवडीमुळे नगरच्या क्रिकेट वर्तुळात चैतन्य निर्माण झाले आहे. यापूर्वी श्रीरामपूरच्या झहीर खानने आंतरराष्ट्रीय पातळीवर नगरचे नाव नेले. त्यापाठोपाठ मूळ संगमनेरकर अजिंक्‍य रहाणेही मैदान गाजवित आहे. 

 

वाडिया पार्कमध्ये रणजी करंडकातील सामने रंगायचे. एकनाथ सोलकर, सुनील गावस्करसारखे खेळाडू "वाडिया'त सामने खेळले आहेत. मात्र, गेल्या दोन पिढ्या "वाडिया'तील वादामुळे खेळापासून वंचित राहिल्या. सुविधा नसतानाही अनुपम, अझीमसारखे खेळाडू चमकत आहेत.

रणजीचा मोसम फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालणार आहे. सोमवारपासून (ता. 9) महाराष्ट्र संघाचे रणजी स्पर्धेतील सामने सुरू होत आहेत. नौशाद शेख महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहे. महाराष्ट्राकडून अतिक्रमणाची धुरा नगरकर द्रुतगती गोलंदाज अनुपम सांभाळत आहे. तो मधल्या फळीत फलंदाजीस येतो. आता त्याच्या जोडीला डावखुरा फिरकी गोलंदाज अझीम आला आहे. नुकत्याच विजय हजारे करंडक व सईद मुश्‍ताक अली करंडकात त्याने चमकदार कामगिरी केली आहे. अनुपम हा समर्थ नेटचा, तर अझीम हा हुंडेकरी स्पोर्टस ऍकॅडमीचा खेळाडू आहे. 
अझीमने यंदा विजय हजारे करंडकात सहा सामन्यांत 13 फलंदाज बाद केले, तर हिमाचल प्रदेशविरोधात केलेल्या 85 धावांच्या कामगिरीने तो प्रकाशझोतात आला. 

azim

सईद मुश्‍ताक अली करंडकात 11 सामन्यांत आठ फलंदाज बाद केले. दोन अर्धशतकांसह 208 धावा केल्या. अझीमचे वडील नाजीर काझी हेसुद्धा काउंटी संघात खेळले होते. अझीमचा भाऊ अश्‍कान 14 वर्षांखालील संघात, तर मोसीन काझी पुणे विद्यापीठाकडून खेळला होता. 

snklecha

टीम इंडियातही नगरकर चमकतील 

नगरमधील खेळांडूमध्ये टॅलेंट आहे. हुंडेकरी, राजेंद्र निंबाळकर यांचा समर्थ नेट हे क्‍लब खेळाडू घडवित आहेत. भविष्यात टीम इंडियातही नगरकर चमकतील. वाडिया पार्कही लवकरच उपलब्ध होईल, त्यासाठी प्रयत्न करू. 
- आमदार अरूण जगताप, सदस्य एमसीए. 

महाराष्ट्राचे नाव उंचवावे 

गेल्या दोन मोसमात अझीमने उत्कृष्ट खेळ केला. या कामगिरीमुळे त्याची रणजीसाठी निवड झाली. त्याने उत्कृष्ट खेळ करीत नगर व महाराष्ट्राचे नाव उंचवावे. 

- सर्फराज बांगडीवाला, प्रशिक्षक, हुंडेकरी स्पोर्टस ऍकॅडमी 

त्याची निवड खेळाडूंना प्रेरणादायी 

नगरला क्रिकेटची मोठी परंपरा आहे. झहीर ग्रामीण खेळाडूंचा "आयकॉन' आहे. या परंपरेला साजेसा अझीमचा खेळ आहे. त्याची निवड खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल. उद्योजक, खेळाडू वसीम हुंडेकरी यांनी खेळाडूंना सुविधा दिल्यानेच हे यश मिळाले. 

- जयंत येलूलकर, माजी सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन 

रणजीतील नगरकर 

झहीर खान - वेगवान गोलंदाज 
बाबा चांदोरकर - फलंदाज 
मनीष कोटस्थाने - फलंदाज 
अर्जुन बरबरे - फिरकी गोलंदाज 
अनुपम संकलेचा - अष्टपैलू 
अझीम काझी - अष्टपैलू 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The selection of the all-round Azim Kazi