#BanManja मांजा बंदी नावालाच; खुलेआम विक्री

परशुराम कोकणे
बुधवार, 23 जानेवारी 2019

सोलापूर : न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही शहरात सर्वत्र नायलॉन आणि काचेरी मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. पतंगाचा कटलेला मांजा झाडांवर, खांबांना अडकून पक्षी दगावत असून दुचाकीस्वारांचा जीव धोक्‍यात आला आहे. पोलिस आयुक्तांचा मांजा विक्री बंदीचा आदेश नावालाच असल्याचे दिसून येत आहे. 

सोलापूर : न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही शहरात सर्वत्र नायलॉन आणि काचेरी मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. पतंगाचा कटलेला मांजा झाडांवर, खांबांना अडकून पक्षी दगावत असून दुचाकीस्वारांचा जीव धोक्‍यात आला आहे. पोलिस आयुक्तांचा मांजा विक्री बंदीचा आदेश नावालाच असल्याचे दिसून येत आहे. 

पतंग उडविण्यासाठी सोलापुरात काचेरी मांजासोबतच नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. याबाबत "सकाळ'ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी आदेश प्रसिद्ध करून मांजा विक्री, वापर, साठवणुकीवर बंदी घातली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत याबाबत एकावरही कारवाई करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी कटलेला पतंग आणि मांजा मिळविण्यासाठी धावणाऱ्या वैभव शिंदे या विद्यार्थ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. गल्लोगल्ली रस्त्यावर पतंग उडविणाऱ्यांमुळे वाहतुकीला होणारे अडथळे नित्याचे झाले आहे. मांजामुळे जखमी होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. पशुपक्षी आणि नागरिकांच्या जिवाला या मांजामुळे निर्माण झालेला धोका पाहता न्यायालयाने या चिनी नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली. मात्र, तरीही शहरात जागोजाग विक्रेत्यांकडून नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 

- छोट्या दुकानांमधून मांजाची सर्रास विक्री सुरू 
- विक्रेत्यांना पोलिस कारवाईचे भयच नाही 
- लहान मुलांसह पालकही घेताहेत मांजा 
- शाळा, महाविद्यालयांमध्ये मांजा बंदीसंदर्भात जनजागृती व्हावी 
- दुचाकीस्वारांच्या गळ्यात अडकून होतो अपघात 
- मांजामध्ये अडकून पक्षी, छोटे प्राणी दगावतात 
- लहान मुले मांजा दाताने तोडत असताना, काचा पोटात जाऊन आरोग्य बिघडते, ओठ कापतात 

काचेरी आणि नायलॉन मांजावर बंदी असूनसुद्धा शहरात अनेक ठिकाणी सर्रास विक्री होत आहे. मांजात अडकून अनेक पक्षी दगावत आहेत. मुलांना मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगून त्यापासून परावृत्त करणे आवश्‍यक आहे. 
- अजित चौहान, पक्षीमित्र 

पतंगासाठी काचेरी आणि नायलॉन मांजा वापरल्याने काय होते याविषयी शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. माणसांसह प्राणी-पक्ष्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. पोलिसांनी बंदीचा नुसताच आदेश न काढता कारवाई करावी. 
- वंदना आळंगे, शिक्षिका

Web Title: selling of Manja openly