हातकणंगलेत सेना, कॉंग्रेस, स्वाभिमानीत दोस्ताना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

कोल्हापूर - भाजप- जनसुराज्य युतीला धोबीपछाड देण्यासाठी हातकणंगले तालुक्‍यात शिवसेना, कॉंग्रेस व स्वाभिमानी हे पक्ष एकत्र आणून मोट बांधण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. या युतीला तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही पसंती असून नेत्यांनीही हिरवा कंदील दाखवल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. अशी युती प्रत्यक्षात आकाराला आल्यास हातकणंगले तालुक्‍यात काटा लढती पाहण्यास मिळण्याचे संकेत मिळत आहेत. 

कोल्हापूर - भाजप- जनसुराज्य युतीला धोबीपछाड देण्यासाठी हातकणंगले तालुक्‍यात शिवसेना, कॉंग्रेस व स्वाभिमानी हे पक्ष एकत्र आणून मोट बांधण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. या युतीला तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही पसंती असून नेत्यांनीही हिरवा कंदील दाखवल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. अशी युती प्रत्यक्षात आकाराला आल्यास हातकणंगले तालुक्‍यात काटा लढती पाहण्यास मिळण्याचे संकेत मिळत आहेत. 

कुठलाच पक्ष स्वतःच्या ताकदीवर विजयापर्यंत पोचू शकत नसल्याचे लक्षात आल्याने व जनसुराज्यला बालेकिल्ल्यातच रोखण्यासाठी या तिन्ही पक्षांच्या युतीची मानसिकता तयार झाल्याचे समजते. कॉंग्रेस व स्वाभिमानीचा जनसुराज्य हा शत्रू आहे, तर सेनेला भाजपचे वाढते वर्चस्व कमी करायचे असल्यामुळे समान शत्रू या सूत्रावर ही युती करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यासाठी भादोले व घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघांत बैठकाही सुरू झाल्या असून यावर सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी माने यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, जनसुराज्यला रोखण्यासाठी आम्ही अशी गोळाबेरीज करत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार न करता केवळ धनदांडग्यांनाच घेऊन राजकारण करण्याचे काम जनसुराज्य व भाजप करत आहे. याला विरोध म्हणून व शेवटच्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. सुरवातीला भादोले मतदारसंघात युतीसाठी चाचपणी झाली असून त्याला सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी होकार दिला आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार सुजित मिणचेकर व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनाही भेटून शक्‍य झाल्यास तालुकाभर याच फॉर्म्युल्यानुसार लढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 

वारणा कारखान्याचे कार्यक्षेत्र असल्याने या भागात जनसुराज्यची ताकद चांगली आहे. त्यांच्या जोडीला आता भाजपचीही शक्ती असल्यामुळे या युतीबरोबर दोन हात करण्यासाठी आघाडीची मोट बांधणे हाच पर्याय असल्याचे समोर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तालुक्‍याच्या दक्षिण भागात शिवसेनेने चांगलाच जम बसविला आहे; तर कॉंग्रेस व स्वाभिमानीला मानणारा प्रत्येक गावात मतदार आहे. यामुळे या तिन्ही पक्षांची युती आकाराला आल्यास जनसुराज्य व भाजपसमोर कडवे आव्हान उभे राहील, अशी चर्चा तालुक्‍यात सुरू आहे. 

मित्रपक्षांना संपवणे हेच भापजचे धोरण असल्याचे आजपर्यंतच्या वाटचालीवरून दिसून आले आहे; तर जनसुराज्य हा आमचा पारंपरिक शत्रू आहे. यांना रोखण्यासाठी आम्ही शिवसेना, कॉंग्रेस, स्वाभिमानी युतीची तयारी सुरू केली आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना भेटून लवकरच संयुक्त बैठकीचे आयोजन करणार आहे. याबाबत कार्यकर्तेही सकारात्मक असल्याने युती आकाराला येण्याचा विश्‍वास वाटतो. 
शिवाजीराव माने, सदस्य, जिल्हा नियोजन समिती, कार्यकर्ते, स्वाभिमानी पक्ष.

Web Title: Sena, Congress, swabhimani friendly in Hatakanangale