मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

शिक्षक भरतीत गैरप्रकार होऊ नये म्हणून संस्थाचालकांनी डावललेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगसह कारणे द्यावीत, असे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. 

सोलापूर - शिक्षक भरतीत गैरप्रकार होऊ नये म्हणून संस्थाचालकांनी डावललेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगसह कारणे द्यावीत, असे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. 

राज्यात सध्या दहा हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार 20 महाविद्यालयांची निवड करण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. महाविद्यालयातील संबंधित विषयाच्या एका रिक्‍त जागेसाठी दहा जणांना पाठविले जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेत शिक्षकांच्या सुमारे अकराशे जागा रिक्‍त असून त्यांनी गुणवत्तेनुसार उमेदवारांची मागणी केली आहे. मुलाखतीनंतर निवडलेल्या उमेदवारांना ऑनलाइन नियुक्‍ती पत्र पाठविण्यात येणार आहे. 

शिक्षक भरतीसाठी महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम कसा द्यायचा, संबंधित उमेदवारांना कोणत्या महाविद्यालयात मुलाखतीसाठी कशा प्रकारे पाठविण्यात येणार, याचे प्रात्यक्षिक आता भावी शिक्षकांना यू-ट्यूबच्या माध्यमातून दाखविले जाणार आहे. शिक्षण विभागाने ही शक्‍कल लढविली असून शुक्रवारपर्यंत (ता. 5) हा व्हिडिओ पवित्र पोर्टलवर अपलोड केला जाणार असल्याची माहिती शिक्षण सहसंचालक कार्यालयाने दिली. 

राज्यात पहिल्या टप्प्यात 10 हजार एक जागांवर शिक्षक भरती सुरू आहे. संबंधित संस्थांकडून जाहिरात निघाली असून आता विषयांनुसार रिक्‍त जागांवर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये पाठविले जाणार आहे. त्यानंतर मे महिन्यात नियुक्‍ती केली जाणार आहे. 
- मीनाक्षी राऊत, उपसंचालक, शिक्षण विभाग, पुणे 

मेनंतर 25 हजार शिक्षकांची भरती 
सातारा, सांगली, पुणे, नागपूर, मुंबई, अमरावती, सोलापूरसह काही जिल्ह्यांतील महाविद्यालये आणि जिल्हा परिषदांनी आचारसंहितेपूर्वी "रोस्टर' पूर्ण करून न दिल्याने सुमारे 25 हजार शिक्षकांची भरती लांबणीवर पडली. आता ही शिक्षक भरती मे महिन्यानंतर होईल, अशी माहिती शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

Web Title: Send video recording of the interview