सीरियल किलर लहरिया दोन खुनांतून निर्दोष मुक्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

कोल्हापूर : स्टेशन रोड आणि परीख पूल येथे झालेल्या फिरस्त्याच्या खुनाच्या आरोपातून संशयित सीरियल किलर दिलीपसिंह लहरिया याची प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी निर्दोष मुक्तता केली.

कोल्हापूर : स्टेशन रोड आणि परीख पूल येथे झालेल्या फिरस्त्याच्या खुनाच्या आरोपातून संशयित सीरियल किलर दिलीपसिंह लहरिया याची प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांनी निर्दोष मुक्तता केली.

रेल्वे स्टेशनसमोर 13 जून 2013 ला फिरस्त्याचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दोनच दिवसांत परीख पूल येथे रस्त्याकडेला झोपलेल्या फिरस्त्याच्या डोक्‍यात सिमेंटची वीट घालून खून करण्यात आला होता. त्यानंतर लक्ष्मीपुरीतही अशाच प्रकारे महिलेचा खून केला होता. यामागे सीरियल किलर असण्याची शक्‍यता वर्तवली गेली. याप्रकरणी 19 जून 2013 ला संशयित दिलीपसिंह कुंवरसिंह लहरिया याला पोलिसांनी अटक केली. या खटल्याची सुनावणी सुरवातीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांच्या न्यायालयात झाली. यानंतर अंतिम सुनावणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अवचट यांच्या न्यायालयात सुरू झाली.

सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अशोक रणदिवे यांनी काम पाहिले. बचावपक्षातर्फे ऍड. दत्ताजी कवाळे यांनी तपासयंत्रणेतील उणिवा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. युक्तिवाद 19 डिसेंबरला संपला. आज न्यायाधीश अवचट यांनी लहरिया याची स्टेशनरोड व परीख पूल येथे झालेल्या फिरस्त्याच्या खुनातून निर्दोष मुक्तता केली. त्याच्यावर अजून लक्ष्मीपुरीत झालेल्या महिलेच्या खुनाचा खटला सुरू आहे. त्याची पुढील सुनावणी 3 जानेवारीला न्यायालयाने ठेवली.

Web Title: serial killer laharia released