मगरींपासून संरक्षणासाठी यंत्रणा उभा करा

राजाराम माने
सोमवार, 2 डिसेंबर 2019

धोका मच्छिमारांबरोबरच शेतकरी, जनावरे यांना

भीमानगरला मगर सापडल्यानंतर भितीचे वातावरण आहे. मगरीपासून केवळ मच्छिमारांनाच धोका नसून जलाशयाच्या काठावर राहणाऱ्यांना, शेतकरी, शेतमजूर, गुराखी, जनावरे आणि जलमार्गाने प्रवास करणाऱ्यांना धोका आहे. वनविभागालाही उपाययोजना करण्याबाबत माहिती नाही.

केत्तूर : उजनी धरणाच्या जलाशयात अलिकडे सतत मगरी आढळून येत आहेत. त्यांच्यापासून संरक्षण व्हावे याकरिता आवश्‍यक यंत्रणा उजनी जलाशय परिसरात उभी करावी. तसेच शोधमोहीम राबवून मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. या मगरी शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहेत. 

हेही वाचा ः ....अन् जंगलात माणसांचा वावर सुरू

भीमानगर (ता. माढा) येथे रविवारी (ता. 1) उजनी धरणाच्या माती बंधाऱ्यावर 12 फूट लांब 150 किलो वजनाची मोठी मगर आढळली. येथील भोई समाजाच्या तरुणांनी ती धाडसाने पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. गतवर्षी कंदर (ता. करमाळा) येथे एक मगर पकडली होती. उजनी जलाशयात अलिकडे मगरींचा वावर असल्याचे आढळून येत आहे. मगरीपासून केवळ मच्छिमारांनाच धोका नसून जलाशयाच्या काठावर राहणाऱ्यांना, शेतकरी, शेतमजूर, गुराखी, जनावरे आणि जलमार्गाने प्रवास करणाऱ्यांना धोका आहे. तालुक्‍यातील वनविभागाशी संपर्क साधला असता याबाबत माहिती नसून कोणती उपाययोजना करावी ते माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा ः वा छान। केसांच्या कचऱयावर यांनी शोधला उत्तम उपाय  

हिंस्र प्राण्याची अस्तित्व दाखविणारी प्रणाली विकसित अलिकडे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून वन्य, हिंस्र प्राण्याची चाहुल, अस्तित्व दाखविणारी प्रणाली विकसित केली गेली आहे. नान्नज (उत्तर सोलापूर) येथील अरण्यात शेळी, बकरे फस्त करणारा लांडगा आढळतो. लांडग्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडत असतात. यावर उपाय म्हणून लांडग्याच्या विशिष्ट आवाजावरून तो परिसरात आल्याची सूचना देणारी यंत्रणा परिसरात उभारण्यात आली आहे. त्यामुळे शेळ्या, मेंढ्या राखणाऱ्याला वन वनविभाग सूचना देतो. त्यामुळे नुकसान टळते. अशा प्रकारची यंत्रणा वन विभागाने उजनी जलाशय परिसरात उभी करावी व दुर्घटना टाळावी, अशी मागणी होत आहे. 
उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी बंडगर, उपाध्यक्ष भारत साळुंके, महेंद्र पाटील, दत्ता आरकिले, वांगीचे सरपंच विठ्ठल सातव, ग्रामपंचायत सदस्य रामेश्‍वर तळेकर, राजाभाऊ देशमुख, बाजार समितीचे संचालक दत्ता रणसिंग यांनी याबाबतची मागणी केली आहे.. 
"उपाययोजना करा' 
"लवकरच मगरीशी संबंधित तज्ज्ञ माहीतगार, वनविभागाचे अधिकारी, उजनी जलाशय परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, तालुका व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, मच्छीमार, बोटचालकांची संयुक्त बैठक घेणार असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वनविभागाला याबाबत उपाययोजना करण्यास भाग पाडावे, असे प्रा. शिवाजी बंडगर यांनी सांगितले.

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Set up a mechanism for protection against crocodiles