
शिल्लक ऊस पाठविताना येणाऱ्या अडचणींना तोंड देताना शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.
निपाणी : निपाणी तालुक्यात 18 हजार 500 हेक्टरपैकी 11 हजार 100 हेक्टर क्षेत्रातील ऊस तोड पूर्णत्वास आली आहे. अद्याप 7 हजार 400 हेक्टर क्षेत्रातील उसाची तोड बाकी आहे. शिल्लक ऊस पाठविताना येणाऱ्या अडचणींना तोंड देताना शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.
निपाणी विभागात नोव्हेंबरमध्ये ऊस तोडण्या सुरु झाल्या आहेत. यंदा ऊस क्षेत्र जास्त व ऊस तोडणारी यंत्रणा कमी असल्याने कारखानदारांसमोरही ऊस उचलीचे प्रारभीपासून आव्हान राहिले आहे. निपाणी कृषी विभागात यंदा 7 हजार 600 हेक्टरपैकी 5 हजार 200 हेक्टर क्षेत्रातील ऊसाची उचल झाली आहे. एकेकाळी तालुक्यात तंबाखू हे प्रमुख पीक होते.
हेही वाचा - कर्नाटक पोलिस आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यात झटापट
मात्र दरवर्षी तंबाखूचे क्षेत्र घटत जाऊन उसाचे क्षेत्र वाढत आहे. मात्र उसाची वेळेत तोडणी व त्याची वाहतूक याचे नियोजन कारखानदारांकडून त्या प्रमाणात होताना दिसत नाही. निपाणी तालुक्यातील ऊस नजीकच्या कर्नाटक-महाराष्ट्रातील कारखान्यांना पाठविला जातो. मात्र दोन्ही राज्यांतील कारखान्यांमध्ये टोळ्या कमी दाखल झाल्या आहेत.
फिल्डमन, कारखान्यातील अधिकाऱ्यांकडून वारंवार तोडणी यंत्रणा कमी असल्याचे सांगितले जात आहे. ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने ज्या-त्या कारखान्यांनी ठेवलेले गाळपाचे उद्दिष्ट यंदा सहज गाठता येणे शक्य वाटते. मात्र अजूनही शिवारात उभ्या असणाऱ्या उसाची उचल वेळेत होत नसल्याने उसाला तुरे फुटत आहेत. परिणामी उसाच्या वजनात घट येत असून उत्पादकांच्या नुकसानीत भर पडत आहे. कष्टाने उभारलेले पीक कारखान्याला जाईपर्यंत शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे. दररोज उत्पादकांचे होणारे नुकसान पाहिले तर ऊस उचलीला कारखान्यांनी अधिक प्राधान्य देण्याची मागणी आहे.
हेही वाचा - शतकोत्तर प्रवासाचा साक्षीदार पाळणा! दिग्गजांसह शंभरावर बाळांचे बारशे -
एक नजर
"निपाणी तालुक्यातील सुमारे 60 टक्के उसाची तोडणी पूर्णत्वास आली आहे. निपाणी कृषी विभागातील 5 हजार 200 हेक्टर क्षेत्रातील उस कारखान्याला पाठविला आहे. उर्वरीत उसाची तोडणी सुरु आहे."
- पुरुषोत्तम पिराजे, कृषी अधिकारी, निपाणी
संपादन - स्नेहल कदम