अबब ! सातारा जिल्ह्यात साडेसात टन प्लॅस्टिक संकलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छता ही सेवा' मध्ये दीड लाख लोकांचे लागले हात.

सातारा : "प्लॅस्टिक मुक्‍त महाराष्ट्र'च्या घोषणा अनेकदा झाल्या. मात्र, प्लॅस्टिक असूनही हटेना झाले आहे. नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिक बंदीचे चळवळ अधिक दृढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने "स्वच्छता ही सेवा' उपक्रमांतर्गत प्लॅस्टिक निर्मूलनाची मोहीम नुकतीच राबविली. त्यात तब्बल साडेसात टन प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन झाले.
 
स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) सातारा जिल्हा परिषदेने देशपातळीवर झेंडा रोवला आहे. याच जिल्हा परिषदेचे पूर्वाश्रमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या कार्यकालात दोन वर्षे ग्रामपंचायती, शाळा, ग्रामस्थांच्या मार्फत प्लॅस्टिक संकलनाचा उपक्रम राबविला होता. 2017 मध्ये 35 टन, 2018 मध्ये 15 टन प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन केले होते. त्याची दखल घेत राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदांमार्फत हा उपक्रम राबविला.
 
सातारा जिल्हा परिषदेने गांधी जयंतीनिमित्ताने दोन ऑक्‍टोबरला एक हजार 490 ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छता ही सेवा' या उपक्रमाअंतर्गत प्लॅस्टिक संकलन मोहीम राबविली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी या उपक्रमाचे नियोजन करून विविध अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी सोपावली होती. या उपक्रमात तीन हजार 171 कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी तसेच दोन 521 शाळांनी सहभाग घेतला. 31 हजार 321 पुरुष, 21 हजार 526 महिला व 79 हजार 815 विद्यार्थ्यांनी तीन हजार 427 तासांचे श्रमदान केले, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी दिली. या उपक्रमातून जमा झालेल्या प्लॅस्टिकचे पुनर्वापर होण्यासाठी ते संबंधित उद्योजकांना दिले जाणार आहे. 

 

कऱ्हाडची बाजी 

जिल्हा परिषदेने ग्रामपंचायती, शाळांमार्फत प्रत्येक गावांत हा उपक्रम राबविला. त्यात तालुकानिहाय संकलन केलेले प्लॅस्टिक किलोनिहाय : सातारा 628, जावळी 498, वाई 206, महाबळेश्‍वर 118, फलटण 1133, पाटण 553, खटाव 476, कोरेगाव 689, खंडाळा 562, माण 1067, कऱ्हाड 1528. 

सहभाग मोहिमेतील... 
1490 ग्रामपंचायती. 
2521 शाळा. 
155849 व्यक्‍ती. 
3427 श्रमदानाचे तास. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven and a half ton plastic collection in Satara district