तीन कोयते, एक चॉपर शस्त्रांसह दहशत माजवणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल; वाचा कुठे घडली घटना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

सांगली शहरातील शामरावनगर येथे घातक शस्त्रे घेऊन दहशत माजवत भांडण करणाऱ्या सातजणांना पोलिसांनी अटक केली.

सांगली ः शहरातील शामरावनगर येथे घातक शस्त्रे घेऊन दहशत माजवत भांडण करणाऱ्या सातजणांना पोलिसांनी अटक केली. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांसमोरच ही घटना घडली. पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन कोयते, एक चॉपर जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर आर्म ऍक्‍टनुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रफीक उमर जहागिरदार (वय 21), उमेर अकबर शेख (वय 21), अमन अन्वर शेख (वय 19, तिघेही रमामातानगर), तौसीफ सलीम मुजावर (वय 19), अतिक सलीम मुजावर (वय 21), साहिल शेख (तिघेही शामरावनगर), उमर जहागिरदार (वय 42, रमामातानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी माहिती दिली, की रफीक जहागिरदार आणि तौसीफ मुजावर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. रविवारी सायंकाळी दोघेही हत्यारे घेऊन एकमेकांसमोर आले. शामरावनगरमधील पन्नास फुटी रस्ता परिसरात सर्व संशयित हत्यारे घेऊन झोंबाझोंबी करीत होते. त्याचवेळी कन्टेनमेंट झोनच्या अंमलबजावणीसाठी काही पोलिस त्या परिसरात गेले होते. 

पोलिसांसमोरच सर्व संशयित हातात घातक शस्त्रे घेऊन एकमेकांवर धावून जात होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांच्याकडील शस्त्रे काढून घेतली. नंतर सर्व संशयितांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशीरा सर्व संशयितांविरोधात आर्म ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान, शस्त्रे घेऊन भांडण करणाऱ्या संशयितांत पिता-पुत्राचाही समावेश आहे. उमर जहागिरदार आणि त्यांचा मुलगा रफीक जहागिरदार यांचा समावेश आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven people arrested with weapons at shamraonagar sangai

Tags
टॉपिकस
Topic Tags: