"सात-बारा'वरून जमीन कसणाराच गायब 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

कोल्हापूर - वर्षानुवर्षे जमीन कसणारा शेतकरीच ऑनलाइन सात-बारा पद्धतीने सात-बारा पत्रकावरून गायब झाला आहे. सात-बारा ऑनलाइन करण्याच्या प्रक्रियेत विभागीय आयुक्तांनीच "पीक पाणी' हा कॉलमच रद्द करण्याचा आदेश दिला. आता नाव कमी झालेल्या, पण जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना पुरावे सादर करून "इतर हक्कात' त्यांची नावे नोंद करावी लागणार आहेत. 

कोल्हापूर - वर्षानुवर्षे जमीन कसणारा शेतकरीच ऑनलाइन सात-बारा पद्धतीने सात-बारा पत्रकावरून गायब झाला आहे. सात-बारा ऑनलाइन करण्याच्या प्रक्रियेत विभागीय आयुक्तांनीच "पीक पाणी' हा कॉलमच रद्द करण्याचा आदेश दिला. आता नाव कमी झालेल्या, पण जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना पुरावे सादर करून "इतर हक्कात' त्यांची नावे नोंद करावी लागणार आहेत. 

अनेक जमिनींच्या सात-बारा पत्रकांवर मालक सदरात एक नाव, तर पीक पाण्याला दुसऱ्याचे नाव होते. "पीक पाणी' या सदरात नाव असलेली व्यक्ती संबंधित जमीन कसत आहे, असा त्याचा अर्थ काढला जात होता. देवस्थानसह इतर इनाम जमिनीचे मालक सदरात संबंधित देवस्थानाचे नाव तर ही जमीन कसणारा म्हणून "पीक पाणी' सदरात संबंधित व्यक्तीचे नाव असायचे; पण अशा अनेक नोंदी खोट्या असल्याचे निदर्शनास आले आहे. काहींनी तलाठ्यांच्या पाहणीत, तर अनेकांनी तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे दावे दाखल करून "पीक पाणी' सदरात स्वतःचे नाव लावून घेतल्याचे प्रकार उघडकीस आले. 

हे प्रकार रोखण्यासाठी व झालेल्या चुकीच्या नोंदी रद्द करण्यासाठी सात-बारा पत्रकावरील "पीक पाणी' कॉलमच ऑनलाइन पद्धतीत रद्द करण्यात आला. त्यामुळे वर्षानुवर्षे जमीन कसणाऱ्यांची नावेच गायब झाली आहेत. "पीक पाणी'तून नाव कमी झालेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा प्रांताधिकारी किंवा तहसीलदारांकडे दावा दाखल करून आपणच ही जमीन कसत असल्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. हे पुरावे सिद्ध झाल्यानंतर अशा शेतकऱ्यांची नावे सात-बारा पत्रकावरील इतर हक्कात समाविष्ट करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया किचकट व खर्चिक असल्याने याला शेतकऱ्यांतून विरोध होत आहे. या संदर्भात अनेक तक्रारी प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्या; पण त्याची दखल घेतलेली नाही. 

जमाबंदी आयुक्तांनी 5 मे रोजी एक परिपत्रक काढून ऑनलाइन सात-बारा हा मूळ हस्तलिखित अभिलेखाशी तंतोतंत जुळणे आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे; पण प्रत्यक्षात मूळ सात-बारावरून "पीक पाणी'चा कॉलम रद्द केल्याने मूळ सात-बारा व संगणकीय सात-बारा यात तफावत दिसत आहे. 

देवस्थानच्या जमिनींचा प्रश्‍न 
देवस्थानच्या जमिनी त्या देवाची सेवा करणाऱ्यांना त्या वेळी कसण्यासाठी दिल्या होत्या. तीन-चार पिढ्या या जमिनी तेच लोक कसतात. इनाम म्हणून मिळालेल्या जमिनीवरही "मालक' सदरात इनाम ज्यांनी दिले त्यांचे नाव तर कसणारा म्हणून पीकपाणी सदरात त्या जमीन कसणाऱ्याचे नाव आहे. 100 वर्षांपासून काही लोक अशा जमिनी कसतात, कूळ कायद्याने काहींनी या जमिनीवर कायदेशीर हक्कही मिळवला आहे; पण त्यांचीही नावे आता गायब झाली आहेत. 

Web Title: Seven-twelve online process