सतरा नंबर अर्जही आता ऑनलाइन उपलब्ध 

संतोष सिरसट
मंगळवार, 24 जुलै 2018

सोलापूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्जही आता ऑनलाइन पद्धतीने स्वीकरण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी असणारे 17 नंबरचे परीक्षा अर्ज येत्या सोमवारपासून (ता. 30) ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास सुरवात होणार आहेत. 

पाचवी उत्तीर्ण असणाऱ्या व वयाची 16 वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट दहावीची परीक्षा देता येते. त्या विद्यार्थ्यांच्या सोईसाठी बोर्डाच्यावतीने दरवर्षी 17 नंबर फॉर्म भरुन घेतले जातात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र निश्‍चित करण्यात आली आहेत. त्या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी अर्ज भरत होते. मात्र, यंदाच्या वर्षापासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-ssc.in.ac या तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.in.ac या संकेतस्थळावर 30 जुलैपासून अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्यासाठी 25 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. ऑनलाइन अर्ज भरताना शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करायची आहेत. 31 जुलै ते 27 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांनी भरलेला मूळ अर्ज, परीक्षा शुल्क, मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्रामध्ये जमा करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज भरताना काही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी 020-25705208 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. 

आर्थिक देवाण-घेवाणीला चाप 
दहावी-बारावीच्या परीक्षेला बाहेरील विद्यार्थ्यांना बसायचे असेल तर केंद्र शाळांकडून त्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात होती. मात्र आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात येणार असल्यामुळे या अर्जांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक देवाण-घेवाणीला चाप बसण्याची शक्‍यता आहे. 

विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्क 
-दहावी - एक हजार 100 रुपये 
-बारावी - 600 रुपये 

Web Title: Seventeen number applications are available online now