कर्नाळा रस्त्यावरील 'त्या' वसतीगृहात आणखी तिघींचा लैंगिक छळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

कर्नाळ रस्त्यावरील पसायदान शिक्षण संस्थेच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींचा लैंगिक छळ प्रकरणी आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत.

सांगली - कर्नाळ रस्त्यावरील पसायदान शिक्षण संस्थेच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींचा लैंगिक छळ प्रकरणी आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. यानिमित्ताने कुरळप येथील मीनाई आश्रमशाळेच्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. जिल्ह्याला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत होता. दरम्यान, काल रात्रीच या अन्य तीन मुलींचेही जबाब पोलिसांनी नोंदवले.

समाज कल्याण विभागाने आता या वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक नंदकुमार ईश्वराप्पा अंगडी (वय ५७, रा. पेठभाग, गवळी गल्ली, सांगली), मुख्याध्यापक आप्पासाहेब महावीर करांडे (वय ४२, रा. यशवंतनगर, सांगली), वाहनचालक आणि मुख्य संशयित संजय अरुण किणीकर (वय ३६), त्याची पत्नी वर्षाराणी संजय किणीकर (वय २८, दोघे रा. पसायदान शाळा, कर्नाळ रोड) या चौघांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यातील किणीकरला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उर्वरित तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

एकूण २३ मुलींच्या वसतिगृहातील खोलीच्या दरवाजाला कडी नसल्याचे दिसून आले. तेथे शेजारीच संशयित संजय आणि वर्षाराणी राहतात. अर्धनग्न अवस्थेत मुलींच्या खोलीत जाऊन त्यांना स्पर्श करणे, गुदगुल्या करणे असे प्रकार त्याने केल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले. या प्रकाराबाबत तक्रारी करूनही संस्थाचालक अंगडी, मुख्याध्यापक करांडे यांनी दुर्लक्ष केले. वर्षाराणीने मुलींना वाच्यता केल्यास चोप देण्याची तसेच नापास करण्याची धमकी दिली. भयभीत मुलींनी काही पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. त्यानंतर आज पोलिस पथकाने पसायदान शाळा व वसतिगृहाची तपासणी केली. उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्यासह पोलिस पथकाने पीडित मुलींचे जबाब  नोंदवले. 

मान्यता रद्दचा प्रस्ताव देणार
वसतिगृहातील अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने मुख्य संशयितासह साऱ्यांना अटक केली. त्यानंतर या शाळेची मुख्याध्यापक पदाची सूत्रे अन्य एका महिला शिक्षिकेकडे दिल्याचे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी सांगितले. वसतिगृहाची मान्यता रद्दचा प्रस्तावही पाठवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वसतिगृहातील अत्याचार प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने मुख्य संशयितासह साऱ्यांना अटक केली. त्यानंतर या शाळेची मुख्याध्यापक पदाची सूत्रे अन्य एका महिला शिक्षिकेकडे दिल्याचे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी सांगितले. वसतिगृहाची मान्यता रद्दचा प्रस्तावही पाठवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: sexual harassment incidence in Sangli Karnala Road hostel