शाहूपुरी बससाठी हिरवा कंदील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

बसअभावी शाहूपुरी ग्रामस्थांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड दूर व्हावा, यासाठी ‘ई- सकाळ’च्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या समस्येवर अवघ्या पाच दिवसांत तोडगा निघाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने शाहूपुरी बससेवा सुरू करण्यासाठी ‘हिरवा कंदील’ दाखवला आहे. याबाबत सातारा आगारप्रमुख नंदकुमार धुमाळ यांनी ‘ई-सकाळ’ला माहिती दिली.

सातारा - बसअभावी शाहूपुरी ग्रामस्थांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड दूर व्हावा, यासाठी ‘ई- सकाळ’च्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या समस्येवर अवघ्या पाच दिवसांत तोडगा निघाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने शाहूपुरी बससेवा सुरू करण्यासाठी ‘हिरवा कंदील’ दाखवला आहे. याबाबत सातारा आगारप्रमुख नंदकुमार धुमाळ यांनी ‘ई-सकाळ’ला माहिती दिली.

कोटेश्‍वर पुलाचे काम पूर्ण होऊन दोन महिने झाले, तरी राज्य परिवहन महामंडळाने वर्षभरापूर्वी शाहूपुरीवासीयांच्या सेवेत असलेली बस अद्याप सुरू केलेली नाही. यामुळे विद्यार्थी, नोकरदारांना, तसेच ज्येष्ठ ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचा प्रश्‍न गुरुवारी (ता. ११) ‘ई-सकाळ’ने मांडला. त्यानंतर शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनानेही कोटेश्‍वर पुलाबाबतचा अहवाल एसटी महामंडळाकडे पाठविलेला आहे. माध्यमे व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे शाहूपुरीत बस सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली होती. आज सातारा आगारप्रमुख श्री. धुमाळ यांनी कोटेश्‍वर पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे पालिकेने पाठविलेले पत्र प्राप्त झाल्याचे सांगितले. श्री. धुमाळ म्हणाले, ‘‘या ठिकाणी बससेवा पूर्ववत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

आंबेदरे, दिव्यनगरी या भागातील रस्त्याची स्थिती व्यवस्थित नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत शाहूपुरीपर्यंत सेवा सुरू करण्यात येईल. दररोज दोन ते तीन फेऱ्या पाठविल्या जातील. प्राथमिक टप्प्यात त्याच्या वेळा निश्‍चित करण्यात अडचण आहे. दैनंदिन सेवा सुरळीत झाल्यानंतर वेळा निश्‍चित करण्यात येतील.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahupuri Bus Service Start