शाहूपुरीवासियांच्या बसला हिरवा कंदील ; दैनंदिन सेवा मिळणार

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 16 जुलै 2019

ई-सकाळ व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे शाहूपुरीत बस सुरू हाेण्याचा मार्ग झाला माेकळा.

सातारा : बस अभावी शाहूपूरी ग्रामस्थांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड दूर व्हावा यासाठी "ई-सकाळ'च्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या समस्येवर अवघ्या पाच दिवसांत तोडगा निघाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने शाहूपूरी बस सेवा सुरु करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. याबाबत सातारा आगार प्रमुख नंदकुमार धुमाळ यांनी "ई-सकाळ'ला माहिती दिली. 
कोटेश्‍वर पुलाचे काम पूर्ण होऊन दोन महिने झाले, तरी राज्य परिवहन महामंडळाने वर्षभरापूर्वी शाहूपुरीवासियांच्या सेवेत असलेली बस अद्याप सुरू केलेली नाही. यामुळे विद्यार्थी, नोकरदारांना, तसेच ज्येष्ठ ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचा प्रश्‍न गुरुवारी (ता. 11) "ई- सकाळ'ने मांडला. त्यानंतर शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनानेही कोटेश्‍वर पुलाबाबतचा अहवाल एसटी महामंडळाकडे पाठविलेला आहे. माध्यमे व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे शाहूपुरीत बस सुरू होईल, अशी आशा व्यक्त केली होती. आज (मंगळवार) सातारा आगार प्रमुख नंदकुमार धुमाळ यांनी कोटेश्‍वर पूलाचे बांधकाम पुर्ण झाल्याचे पालिकेने पाठविलेले पत्र प्राप्त झाल्याचे सांगितले. धुमाळ म्हणाले या ठिकाणी बस सेवा पुर्ववत करण्याच्या सूचना केल्या आहेत. आंबेदरे, दिव्यनगरी या भागातील रस्त्याची स्थिती व्यवस्थित नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत बसस्थनाक, राजवाडा, शाहूपूरी पर्यंत सेवा सुरु करण्यात येईल. दररोज दोन ते तीन फेऱ्या पाठविल्या जातील. प्राथमिक टप्प्यात त्याच्या वेळा निश्‍चित करण्यात अडचण आहे. दैनंदिन सेवा सुरळीत झाल्यानंतर वेळा निश्‍चित करु असे धुमाळ यांनी नमूद केले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahupuri citizens will get state transport bus facility soon