प्रांजलला मोठं करायचंय...!

शाम पाटील
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

शाहूवाडी - मुलगा आणि सुनेने केलेल्या कृत्याने नात प्रांजल एकाकी झाली आहे. तिला मोठी करायचंय..., असे पाणावलेल्या डोळ्यांनी आजी-आजोबा सांगत होते. शाहूवाडी तालुक्‍यातील सावर्डी येथे विषारी पदार्थ पाजून पोटच्या गोळ्याचा आई-वडिलांनी जीव घेतला. त्यांना पोलिसांनी अटक केली.

शाहूवाडी - मुलगा आणि सुनेने केलेल्या कृत्याने नात प्रांजल एकाकी झाली आहे. तिला मोठी करायचंय..., असे पाणावलेल्या डोळ्यांनी आजी-आजोबा सांगत होते. शाहूवाडी तालुक्‍यातील सावर्डी येथे विषारी पदार्थ पाजून पोटच्या गोळ्याचा आई-वडिलांनी जीव घेतला. त्यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर घरी असलेल्या दोन वर्षांच्या प्रांजलला घेऊन आजोबा बंडू पाडावे आणि आजी अकूबाई आज घरात बसून होते. त्यांना पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले. या घटनेने अख्खं गाव सुन्न झालं आहे. गल्लोगल्ली, पारावर याच विषयाची चर्चा होती. प्रकाश आणि जयश्री पाडावे या दाम्पत्याचा तिरस्कार केला जात होता.

पाडावे कुटुंबातील आजोबा-आजीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ‘प्रांजलला मोठं करायचयं...’ एवढंच ते वारंवार सांगत होते. प्रांजलला मांडीवर घेऊन तिची समजूत काढत होते. 

बाल कुठंय...
प्रांजलला आपल्या छोट्या बहिणीची आठवण आली की बोबड्या बोलात ‘बाल कुठंय....’ असे म्हणत होती. ते ऐकताच उपस्थितांचे हृदय पिळवटून निघत होते. प्रत्येक जण धुमसून रडत होते.

तिही अधूनमधून मम्मी-पप्पा, बाळ कुठे आहे....म्हणून त्यांची आठवण काढते.

शाहूवाडीच्या दुर्गम डोंगराळ भागातील सावर्डी हे अगदी छोटेगाव. आजी अकूबाई, आजोबा बंडू, मुलगा प्रकाश, सून जयश्री व त्यांच्या सिद्धा आणि प्रांजल या दोन मुली असे पाडावे कुटुंब. आजोबा कोल्हापूरनजीक गुऱ्हाळघरात, तर मुलगा प्रकाश कोल्हापुरात नोकरीला. आजी अकूबाई व सून जयश्री घरकामात. त्यामुळे परिस्थिती बेताचीच, पण दोन वर्षांच्या प्रांजलनंतर सिद्धीचा जन्म झाला आणि घरात ती ‘नकोशी’ची भावना प्रकाश व जयश्रीच्या मनात घर करू लागली. त्यातूनच माणुस्कीला काळिमा फासणारा निर्णय जयश्री व प्रकाशने घेतला.

चार ऑक्‍टोबरची काळरात्र त्यासाठी निवडली गेली. घरात खाण्यातून सिद्धीला थिमेट हा अत्यंत विषारी पदार्थ पाजला गेला. विषारी औषधाने तडफडणाऱ्या सिद्धीला दवाखान्यात नेले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदनाला आई जयश्रीने विरोध केला. हाच मुद्दा अखेर सिद्धीच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यात महत्त्वाचा धागा ठरला. आई-वडिलांचे निर्दयी कृत्य शवविच्छेदन अहवाल व फॉरेंसिक लॅब अहवालात उघड झाले. पोलिस कोठडीत असणाऱ्या जयश्री व प्रकाश यांच्या चेहऱ्यावर आजही अपराधाचा लवलेश नव्हता.
‘लेक वाचवा, लेक वाढवा, लेक शिकवा’ या मोहिमेतून देशभरात शासनातर्फे मुलींबाबत जागरुकता निर्माण केली जात आहे. मुलगाच वंशाचा दिवा ही मानसिकता बदलण्यासाठी गावपातळीवर अजून प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 

Web Title: Shahuwadi Murder incidence special story