अस्वस्थ म्हैसाळच्या पोटातल्या कळा

शैलेश पेटकर
शुक्रवार, 10 मार्च 2017

सरंजामदार म्हैसाळकर-शिंदेंच्या पराक्रमाच्या गाथा इतिहासाच्या नोंदीत. स्वातंत्र्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या वसंतदादा साखर कारखान्याचे संस्थापक संचालक आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, आमदार मोहनराव शिंदे-म्हैसाळकर यांच्या राजकीय प्रभावाखालील म्हैसाळची आजची ओळख मात्र ‘भ्रूणहत्येचं म्हैसाळ’ अशी झालीय. यात गावाचा दोष तो काय? मात्र अशी कुकर्मांकडे डोळेझाक केल्याचे प्रायश्‍चित्त गाव भोगतेय. हीच मूक भावना इथल्या ग्रामस्थांसोबतच्या संवादातून पुढे आली. साम टीव्ही आणि ‘सकाळ’च्या चमूने टिपलेला हा आँखो देखा हाल...

सरंजामदार म्हैसाळकर-शिंदेंच्या पराक्रमाच्या गाथा इतिहासाच्या नोंदीत. स्वातंत्र्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणावर ठसा उमटवणाऱ्या वसंतदादा साखर कारखान्याचे संस्थापक संचालक आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, आमदार मोहनराव शिंदे-म्हैसाळकर यांच्या राजकीय प्रभावाखालील म्हैसाळची आजची ओळख मात्र ‘भ्रूणहत्येचं म्हैसाळ’ अशी झालीय. यात गावाचा दोष तो काय? मात्र अशी कुकर्मांकडे डोळेझाक केल्याचे प्रायश्‍चित्त गाव भोगतेय. हीच मूक भावना इथल्या ग्रामस्थांसोबतच्या संवादातून पुढे आली. साम टीव्ही आणि ‘सकाळ’च्या चमूने टिपलेला हा आँखो देखा हाल...

सकाळी दहाच्या सुमारास आमची टीम म्हैसाळमध्ये पोहोचली तेव्हा तिथं खिद्रापुरेच्या हॉस्पिटलरूपी कसाईखान्याच्या आवारात पंचक्रोशीतील आलेल्या बघ्यांची गर्दी होती. आम्ही गावच्या वेशीवरच जिथं खिद्रापुरेने भ्रूण पुरले होते त्या दिशेने आम्ही गेलो. ठिकाण अंगावर काटा येणारं होतं. जेसीबीनं खोदलेल्या जागेचे ते दृश्‍य मनात काहूर माजवणारे होते. किती कळ्या उमलण्याआधी इथं गाडल्या, या प्रश्‍नांनी डोकं सुन्न झालं. त्यांच्या हत्या झाल्या... निर्घृणपणे त्यांच्या बापजाद्यांनीच केल्या. त्यासाठी त्यांनी कसाई निवडला खिद्रापुरे. 

तेवढ्यात गाड्यांचा ताफा गावात शिरला. खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जिल्ह्यातील राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह पोलिस आणि अधिकाऱ्यांचा गोतावळाही शिरला होता. ते आले आले म्हणेपर्यंत आम्ही तिथं पोहोचलो, मात्र त्यांची भेट आटोपली होती. सरंपच... मनोरमादेवी शिंदे यांनी मंत्र्यांना काहीएक सांगायचा प्रयत्न केला, मात्र त्यांचं काही ऐकायच्या मनःस्थितीतही ते नव्हते. ‘साम’चे संपादक संजय आवटे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी त्यांना धावत जाऊनच गाठले. मात्र ‘आम्हाला हाऊसमध्ये बोलायचं आहे’, ‘तपास सुरू आहे’ अशी टिपिकल उत्तरे देत त्यांनी आलिशान गाड्यांमध्ये बैठक मारली आणि धुरळा उडवत ताफा निघूनही गेला. 

त्यानंतर आमची सारी टीम तिथं जमलेल्या नागरिकांकडे वळली. अनेकांना भावनांचा बांध फुटला. ते मोकळेपणाने धाडसाने सांगायचा प्रयत्न करीत होते. त्यांचे अनुभव संताप आणणारे... शहारे आणणारे होते. एक बाई पुढे आल्या, म्हणाल्या, ‘‘त्या नराधमालाच नव्हे तर त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेवरही कडक करवाई झाली पाहिजे.’’ असं सांगतानाच तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. एव्हाना खिद्रापुरेचा कसाईखाना बघ्यांचा अड्डा झाला होता. त्या गर्दीतून वाट काढत आम्ही तिथं पोहोचलो. खिद्रापुरेचे घर बंद ठेवून आत कुणालाही सोडले जात नव्हतं. कारण पोलिस तपास. मग आम्ही ठरवलं, लोकांशीच बोलू. सरपंच मनोरमादेवी शिंदे-म्हैसाळकर पुढं आल्या. म्हणाल्या, ‘‘आज महिला दिनी यावर बोलावं लागतंय, याचं दुःख आहे. तो कसाई खिद्रापुरे आमच्या गावचा नव्हे. असं काही तो इथं करीत असावा असं आम्हाला कळालंच नाही.’’ शेजारीच बळी स्वाती जमदाडेचे वडील होते. पाणावल्या डोळ्यांनी ते बोलू लागले. ‘‘आमच्या स्वातीला दोन मुली. तिसरी मुलगीच असल्याचे जावयांना समजले. त्यानंतर त्यांनी गर्भपात करण्यासाठी खिद्रापुरे डॉक्‍टरांकडे आलोय, असं फोनवरच सांगितलं. मी नकार दिला. मात्र त्यानं ऐकलं नाही, आम्ही इथं येण्यापूर्वीच आमची पोर गेली होती. अशी वेळ कुणावरही येऊ नये यासाठी मी तिच्या सासरविरोधात उभे राहिलो.’’ वडिलांची ही कैफियत अश्रूंचा बांध फोडणारी होती. 

कुठल्या जाहिरातीशिवाय खिद्रापुरेचा दवाखाना ‘हाऊसफुल्ल’ होता. तसंच आजचंही चित्र होतं. हा डॉक्‍टर चुकीचं काही तरी करतोय याची कुणकुण सर्वांना होती, मात्र त्याला विरोध कोणी करायचा? त्याचे हात वरपर्यंत ही एक अनामिक भीती होती. ज्यांनी असे प्रयत्न केले त्यांच्या तक्रारी प्रशासनाने रीतसर निकाली काढल्या. यंत्रणेच्या डोळ्यांवर पट्ट्या होत्या इतकेच, अशा शब्दांत म्हैसाळचे लोक संताप व्यक्त करताना दिसले.  खिद्रापुरेनं गावाला बट्टा लावल्याची खंत व्यक्त होत होती. आम्ही गर्दीला हटवत तिथून हाकेच्या अंतरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात चालतच पोहोचलो.  तिथला ‘स्वच्छ’ कारभार चकित करणारा होता. मोमीन नामक अधिकाऱ्यांनी जाताच पालुपद लावलं, ‘मी सहा महिन्यांपूर्वीच इथं आलोय.’ मग सहा महिन्यांत या दवाखान्याला परवाना आहे का, याची चौकशीही त्यांनी केली नाही. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी भेटीदरम्यान खिद्रापुरेच्या हॉस्पिटलच्या मागील बाजूला सर्व रेकॉर्ड व औषधे जाळण्यात आल्याचे उघडकीस आणलं. पोलिस येण्याआधीच सारं काही नष्ट करणारे खिद्रापुरेचे पाठीराखे कोण? या कसाईला लाजवेल अशा थंड डोक्‍याने त्याने अनेक जीव भूतलावर येऊच दिले नाहीत. त्याच्या या कटातील सहभागी सर्वांपर्यंतच पोलिस यंत्रणा पोहोचेल का? पोहोचलीच तर त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल होईल का ? झाले तर या गुन्हेगारांना शिक्षा होईल का? हे सारे प्रश्‍न मनात ठेवूनच आम्ही सांगलीच्या दिशेने निघालो. पोटात दुःखाचा खड्डा पडलेला. मेंदूचा पार भुगा झाला होता.

बेकायदा सोनोग्राफी केंद्र तपासणी मोहीम
मिरज - म्हैसाळमध्ये उघडकीस आलेल्या भ्रूणहत्या प्रकरणाचा धडा घेत जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व अनोंदणीकृत नर्सिंग होम, गर्भपात केंद्रे, रुग्णालये व सोनोग्राफी केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. याबाबतचे फर्मान तालुका अधिकाऱ्यांना पाठवले असून २७ मार्चपर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी संयुक्त आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे, की स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याचे प्रकरण घडल्याने जिल्हाभर तपासणी मोहीम राबवली जावी. नोंदणी न करताच असे उद्योग सुरू असणाऱ्यांची माहिती घ्यावी. सर्वतोपरी तपासणी करून सुस्पष्ट अहवाल २७ मार्चपर्यंत सादर करावा. माहिती घ्यावी लागणाऱ्या मुद्द्यांची सूचीही सोबत जोडली आहे. सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका ग्रामीण रुग्णालये, आरोग्याधिकारी, पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांना आदेश जारी करण्यात आला आहे.

Web Title: shailesh pethkar article on mhaisala