शनिशिंगणापूर रस्त्यामागे साडेसाती

Shani Shaningapur road work incomplete
Shani Shaningapur road work incomplete

सोनई (नेवासे)  : शनिशिंगणापूर ते राहुरी रस्त्यामागे लागलेली साडेसाती काही केल्या सुटताना दिसत नाही. अर्धवट व रखडलेल्या कामामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आयुष्यातील प्रश्‍न सुटावेत, यासाठी येथे येणाऱ्या भाविकांना प्रथम या रस्त्याची साडेसाती सहन करावी लागते आहे. 

शनिशिंगणापूरला स्वयंभू शनिदर्शनासाठी वाढलेली गर्दी लक्षात घेऊन पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून शिंगणापूर ते राहुरी या 22 किलोमीटर सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्यासाठी 111 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मागील वर्षी रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. कामाचा दर्जा व गतीबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने त्याची कधी दखलच घेतली नाही. 

दगड, खडी नि मुरमाचे ढीग रस्त्यावरच

रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहे. पर्यायी रस्त्याची अवस्था तर विचारायलाच नको. दगड, खडी नि मुरमाचे ढीग रस्त्यावरच आहे. गेल्या महिनाभरात या रस्त्यावर आठ ते दहा लहान-मोठे अपघात झाले. भाविक, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच या रस्त्याने प्रवास करावा लागतो. 

नदी व ओढ्यावरील पुलाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी पर्यायी मार्ग बनविले. मात्र, त्याची अवस्था दयनीय आहे. अनेक ठिकाणी 10 ते 15 फुटांचे काम सोडून मोठ्या यंत्राने सिमेंट रस्ता करण्यात आला. आता लहान यंत्र अथवा कामगारांच्या हाताने काम केले जात आहे.

कामगार दिवाळी सुटीवरच

दिवाळी सुट्यांनंतर कामगार कामावर न परतल्याने अडचणींत भर पडत आहे. त्यातही सुटीच्या दिवशी, विशेषत: शनिवारी-रविवारी या रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडी होते. अपघातात होतात. त्यातून वादावादी नि भांडणे ठरलेलीच; मग रस्त्यालाच शिव्यांची लाखोली वाहत, चालक तेथून काढता पाय घेतात. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. 
 

अपघातांचे प्रमाण वाढले
रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शालेय विद्यार्थ्यांना कसरत करीतच शिक्षणासाठी ये-जा करावी लागते. अनेकदा तक्रारी करूनही कुणीच दखल घेत नाही. 
- सुनीता गडाख, माजी सभापती, पंचायत समिती 
 

रस्त्यावरील ढीग हलविले जातील
व्यावसायिकांनी सांगितल्याने रस्त्याचे सलग काम करता आले नाही. डिझाईन न आल्याने आंबेडकर चौकातील काम रखडले आहे. रस्त्यावरील साहित्याचे ढीग आजच हलविले जातील. 
- अफजल शेख, ठेकेदार, गुलशन एजन्सी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com