हुतात्मा शंकर तोरस्करांचे नाव स्तंभावर 

सुधाकर काशीद
मंगळवार, 1 मे 2018

कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 107 जण हुतात्मे झाले. त्यांचे मुंबईत हुतात्मा चौकात (फ्लोरा फाऊंटन) स्मारक उभे राहिले; पण या चळवळीत पहिले हुतात्मा कोल्हापूरच्या शंकर दत्तात्रय तोरस्कर यांचे नाव हुतात्म्यांच्या यादीत यायला 60 वर्षे आणि हुतात्मा स्तंभावर त्यांचे नाव कोरायला 62 वर्षे लागली.

काही दिवसांपूर्वी त्यांचे नाव हुतात्मा स्तंभावर कोरले गेले. उद्या महाराष्ट्रदिनी पहिल्यांदा त्यांच्या नावासह असलेल्या हुतात्मा स्तंभास सारा महाराष्ट्र अभिवादन करणार आहे. 

संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणाची पर्वा न करता लढलेल्या शंकर तोरस्कर यांचा हौतात्म्याला यानिमित्ताने उजाळा मिळाला आहे. आणि शासकीय लाल फितीच्या कारभारात एखाद्याचे हौतात्म्यही 60 वर्षे कसे लटकून राहते याचा जळजळीत घटनाक्रम पुढे आला आहे. 

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोल्हापूर हा केंद्रबिंदू होता. 18 जानेवारी 1956 रोजी कोल्हापुरातील बिंदू चौकात या चळवळीची जाहीर सभा होती. जुना बुधवार पेठेतील हजारावर कार्यकर्ते शाहू टॉकीजपासून पुढे बिंदू चौकाकडे जात होते. मात्र सभाच होऊ द्यायची नाही. या तयारीने पोलिसांनी कारवाई चालू केली. जुना बुधवार पेठेच्या कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसाच्या बंदुकीची संगीन तोरस्कर यांच्या पोटात घुसली. त्यात सात दिवसांनी म्हणजे 25 जानेवारीला त्यांचे निधन झाले. त्या रात्री एक वाजता तोरस्कर यांची विराट अंत्ययात्रा निघाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील पहिले हुतात्मे म्हणून ते ओळखले जाऊ लागले. 

वृत्तपत्रे, नोंदी पुरावे म्हणून सादर 
मुंबईत फ्लोरा फाऊंटनला चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्तंभ उभा केला. त्यावर 106 हुतात्म्यांची नावे कोरली; पण त्यात तोरस्करांच्या नावाचा उल्लेख झाला नाही. तोरस्करांचे पुतणे संजय यांना मात्र ते खटकत होते. त्यांनी पाठपुरावा सुरू केला आणि "तुमचे काका खरोखरच हुतात्मे ठरले याचे पुरावे काय?' असा जिव्हारी लागणारा प्रश्‍न त्यांना मंत्रालयात विचारला गेला. त्यांनी त्यावेळची वृत्तपत्रे, पोलिसांतील नोंदी, इस्पितळातील नोंदी हे पुरावे दिले.

प्रा. एन. डी. पाटील, बाबूराव धारवाडे यांनी दिलेली माहितीही सादर केली आणि त्यामुळे 2016 साली हुतात्म्यांच्या यादीत तोरस्कर यांचे नाव घातल्याची अधिसूचना निघाली. आणि काही दिवसांपूर्वी हुतात्मा स्तंभावरील हुतात्मा यादीत त्यांचे नाव कोरले गेले. 

शंकर तोरस्कर यांचे नाव हुतात्म्यांच्या यादीत त्यावेळीच यायला हवे होते; तब्बल 60 वर्षांनंतर व तेही त्यांच्या कुटुंबीयांनी हा विषय लावून धरल्यानंतर त्यांचे नाव यादीत आले. आता हुतात्मा स्तंभावर नाव कोरले. यात आम्हा कुटुंबाचा कसलाही आर्थिक फायदा नाही. केवळ नव्या पिढीसमोर चळवळीचा इतिहास यावा म्हणून प्रयत्न केले. 
- संजय तोरस्कर

Web Title: Shankar Toraskars name appeared on hutatma chowk statue for the first time